औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत ४२ शिफारशी

आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत शिफारशी करताना तज्ज्ञ.
आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत शिफारशी करताना तज्ज्ञ.

औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेचा शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी समारोप झाला.  शेतकऱ्यांच्या सुक्ष्म सिंचनातील नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तृणधान्य तसेच इतर पिकांकरिता सुक्ष्म सिंचन वापरासाठीच्या अनुदान धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, यासह सुक्ष्म सिंचनाच्या विस्ताराच्या अनुषंगाने आवश्‍यक ४२ शिफारशी या वेळी करण्यात आल्या. या शिफारशीनुसार जगभरातील देशांसह भारतातील केंद्र व राज्य शासनाकडून धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.

नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेच्या समारोपीय सत्राला केंद्राचे जलसंसाधान विभागाचे सचिव यू. पी. सिंग, ‘आयसीआयडी’चे अध्यक्ष फेलिक्‍स रिंडर्स, ‘आयएनसीएसडब्ल्यू- सीडब्ल्यूसी’चे अध्यक्ष एस. मसुद हुसेन, ‘वॅपकॉस’चे व्यवस्थापकीय संचालक आर. के गुप्ता, ‘सीडब्ल्यूसी’चे सदस्य एस. के. हलदर उपस्थित होते.

या तीनदिवसीय परिषदेत २३ तांत्रिक सत्रे झाली. या सत्रांच्या माध्यमातून ११५ सादरीकरणे झाली. यामाध्यमातून ४२ शिफारशी करण्यात आल्या. ‘आयसीआयडी’चे फेलीक्‍स रिंडर्स यांनी या वेळी मार्गदर्शन केले. एस. के. सलदर यांनी शिफारशींचे सादरीकरण केले. ‘सीडब्ल्यूसी’चे संचालक अनुज कनवाल यांनी आभार मानले.

`उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक` पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सचिव यू. पी. सिंग म्हणाले, की देशातील बहुतांश भागाला पाणी प्रश्नाने ग्रासले आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे. जलसंधारण व इतर उपचारांच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवून त्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्‍यक आहे. पाणी बचतीसोबत उत्पादकताही वाढविणे व टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. सुक्ष्म सिंचन त्यासाठीचा एक पर्याय आहे. त्यानुषंगाने आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषद हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. देशात सुक्ष्म सिंचन वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून राज्य व केंद्र शासन अनुदान देते आहे. ज्या शेतकऱ्यांनी या प्रणालीचा स्वीकार केला त्यांच्यासमोर ती प्रणाली टिकवून ठेवण्याचे वा त्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब पुढे आली.

सुक्ष्म सिंचन प्रणालीच्या उत्पादनात छोट्या कंपन्याही उतरत आहेत. उत्पादक वाढले की त्याचा फायदा प्रणालीची किंमत करण्यात होईल अशी आशा आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न आहेत. दोन राज्यांमध्ये नदी जोड प्रकल्पासाठी एकमत होण्यात मोठ्या अडचणी असल्याने प्रकल्प कधी पूर्ण होतील हे निश्चित सांगता येत नाही. आधी योजना जाहीर व्हायच्या परंतु त्या योजनांच्या पूर्तीसाठी निधी उपलब्ध होत नसे. त्यामुळे नव्याने योजना जाहीर करण्यापेक्षा आहेत त्या योजना पूर्ण करून किंवा उपलब्ध पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यावर केंद्र शासन भर देत आहे. शेवटी पाणी प्रश्न, सुक्ष्म सिंचन प्रणालीचा विस्तार आदी प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारी संबंधित राज्यांची असते. केंद्र शासन राज्यांना निधी किंवा तांत्रिक मार्गदर्शनच करू शकते, असेही श्री सिंग यांनी सांगितले.  आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेतील प्रमुख शिफारशी

  • हवामान बदलाच्या परिस्थिती सर्वांना योग्य प्रमाणात पाणी, अन्न व अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी सुक्ष्म सिंचनाच्या वापरातून पाण्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.
  • शेतीत पाण्याचा सर्वाधिक वापर होऊनही देशांतर्गत उत्पन्नात १६ टक्‍केच वाटा आहे. सुक्ष्म सिंचनात गुंतवणूक कमी केल्यामुळे कमी पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन देशांतर्गत उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते. शिवाय बचत झालेल्या पाण्याचा आर्थिक फायदा देणाऱ्या कार्यात वापर होऊन देशांतर्गत उत्पन्न वाढीस मदत होईल.
  • शेतकऱ्यांच्या सुक्ष्म सिंचनातील नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
  • अनुदानावरून कर्जरूपी आदर्श योजनांकडे वळावे लागेल. सोबतच प्रकल्पाकडून कार्यक्रमरूपी अभियानाकडे वळणे सुक्ष्म सिंचनविस्तारासाठी आवश्‍यक आहे.
  • सुक्ष्म सिंचन प्रणालीच्या किमती त्याच्या प्रसारावर परिणाम करतात. दुसरीकडे कमी किमतीची सुक्ष्म सिंचन प्रणाली सर्वांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते.
  • भुपृष्ठातंर्गत असलेली सुक्ष्म सिंचन प्रणाली पाणी वाचविण्यात फायद्याची आणि शाश्वत ठरल्याचे दिसते.
  • बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होते.
  • सौरऊर्जेचा वापर जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना सिंचन करण्यासाठी व्हावा.
  • आयसीआरने विकसित केलेल्या जैविक सांडपाणी सुधारणा पद्धती पाण्याच्या पुनर्वापरासाठी केल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतींपेक्षा स्वस्त आहेत.
  • निविष्ठांऐवजी संसाधन म्हणून पाण्याचा वापर करण्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com