राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीजवापराचे ऑडिट करणार

राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीजवापराचे ऑडिट करणार
राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीजवापराचे ऑडिट करणार

नगर : महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र "ऑडिट" करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धीत काल (सोमवारी) ही माहिती दिली. ऑडिटमुळे शेतकऱ्यांचा वीजवापर निश्‍चित होऊन वीजबिलाबाबतच्या तक्रारी निकाली निघतील, असे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. बावनकुळे राळेगणसिद्धी येथे आले होते. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या वीजबिलाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची तातडीने दखल घेऊन बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची भेट घेऊन सरकारकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, ‘‘शेतीपंपांच्या वीजवापराचे काटेकोर नियोजन व्हावे, यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच कृषिपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यांत हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्पप्रतिसाद मिळाला असून, शेतीपंपांची थकबाकी २९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहाेचली आहे. शेतकऱ्यांकडे व्याज, दंड वगळता १८ हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी उरणार नाहीत,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या या योजनेला अधिक गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पात आणखी तीन मेगावॉटची क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्थेला अधिकचे वीजबिल पाठविले असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. त्यामुळे कोणी दोषी आढळले तर त्या दोषी अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com