राज्यातील ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित

राज्यातील ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित
राज्यातील ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित

पुणे : निकृष्ट निविष्ठा विक्रीप्रकरणी कृषी आयुक्तालयाने तपासणी मोहिमेंतर्गत दोषी आढळणाऱ्या संबंधित ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर २७९ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.

बियाणे, खते आणि कीटकनाशके (निविष्ठा) विक्रेत्यांवर नियमितपणे तपासण्या करून दोषींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१७ पासून ते २२ फेब्रुवारी २०१८ अखेर ही कारवाई करण्यात आली. यात निकृष्ट बियाणांचे १७ हजार ७२४, खतांचे १६ हजार ७२४ आणि कीटकनाशकांचे सहा हजार ५९३ मिळून एकूण ४१ हजार ४३ नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३९ हजार ९७४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, १ हजार ६९ नमुन्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर, प्रत्यक्षात बियाणांचे ४८६, खतांचे २ हजार ४४ आणि कीटकनाशकांचे २४४ मिळून एकूण २ हजार ७७४ नमुने दोषी अथवा अप्रमाणित आढळलेले आहेत.

अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कृषी विभागाने न्यायालयामध्ये दावे दाखल केलेेले आहेत. त्यात बियाण्यांबाबत २०८, खतांचे ५७७ आणि कीटकनाशकांचे ३७ मिळून ८२२ दाव्यांचा समावेश आहे, तर बियाणांचे १६, खतांच्या २६ आणि कीटकनाशकांच्या १६ मिळून ५८ जणांविरोधात पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच, बियाणे ६८, खते २४२ आणि कीटकनाशकांच्या ११४ मिळून अप्रमाणित माल आढळलेल्या ४२४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

निविष्ठांचा १२०९ टन साठा केला जप्त... कृषी विभागाच्या पथकांनी दोषी आढळलेल्या निविष्ठाधारकांच्या गोदामांमधील माल जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्यामध्ये बियाणांचा ३६५.४७ टन, खतांचा ७८९.२७ टन आणि कीटकनाशकांच्या ५५.१४ मिळून एकूण १२०९.८८ टन माल जप्त करण्यात आलेला आहे. या सर्व जप्त केलेल्या मालाची किंमत ६ कोटी २० लाख रुपये आहे. विक्रेत्यांकडे निविष्ठांचा अनधिकृत साठा आढळणे, नमुने अप्रमाणित निघणे आदींसारख्या बाबी तपासणीत आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com