कृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवी केंद्रे सुरू करणार

कृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवे केंद्र सुरू करणार
कृषी हवामान सल्ल्यासाठी ५३० नवे केंद्र सुरू करणार

पुणे : कृषी उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी देशात १३२ क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र कार्यरत अाहेत. यातून शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा एसएमएसच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यात येतो. अधिकाधिक शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला देण्यासाठी पुढील वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील हवामान केंद्राचे उपमहासंचालक डाॅ. एस. डी. अत्री यांनी दिली.

राज्याचा कृषी विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय आयोजित कृषी-हवामान सल्ला सेवा पुरविणाऱ्या भागधारकांच्या बुधवारी (ता.१४) राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राज्याचे कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या डाॅ. सुलोचना गाडगीळ, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान संशोधन व सेवा विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. सहाय, डाॅ. एन, चटोपाध्याय, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ व विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दादाभाऊ पोखरकर आदी या वेळी उपस्थित होते.

डाॅ. अत्री म्हणाले, की देशभरातील सर्व शेतकऱ्यांना हवामान सल्ला देताना विविध विषयांत क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे. यात शेती, फलोत्पादनाबरोबरच पशुसंवर्धन, मस्यव्यवसाय यांचाही विचार करावा लागेल. डाॅ. सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, की माॅन्सून हा शेतकऱ्यांसाठी जुगार ठरत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करून, गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी योग्य वेळी सल्ला मिळाला पाहिजे. त्यासाठी हवामान खाते, कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यावश्‍यक सेवा द्याव्यात.

डाॅ. गाडगीळ म्हणाल्या, की हरितक्रांतीच्या वेळी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, हवामानाकडे दुर्लक्ष झाले होते. हवामानात वेगाने होणारे बदल विचारात घेऊन यापुढे प्राधान्याने विचार करावे लागेल. शेतकऱ्यांना हवामानविषयक सेवांचा मिती उपयोग होतो, याचा अभ्यास केला जावा. आवश्‍यतेनुसार विविध विषयांच्या समन्वयाने किफायतशीर सेवा द्याव्यात. डॉ. सहाय म्हणाले, की सध्या हवामान विभागातर्फे जिल्हास्तरावर अंदाज देण्यात येत असून, तालुकास्तरावरील अंदाज देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा अंदाज अचूक नसून, शक्यतांवर अधारित असतो. डॉ. रसाळ म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन आणि संरक्षणासाठी हवामान सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. शेतीशी निगडित सर्व विभागांनी यासाठी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com