बुलडाण्यात ५८० सौर कृषिपंप कार्यान्वित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  : जिल्ह्यात अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत सौरऊर्जेवर आधारित ५८० कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. विभागात या जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सौरऊर्जेची साथ मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांची भारनियमन, वीजकपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यापासून सुटका झाली आहे.

राज्यात २० जिल्ह्यांमध्ये अटल सौरकृषिपंप योजना राबवली जात असून त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. यामध्ये तीन एचपी, पाच एचपी व साडेसात एचपी असलेल्या पंपांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून अनुदानित पंप मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्प भूधारक आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर सौरकृषिपंप देण्याच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५८० लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाला असून त्यांच्या शेतात सौरकृषिपंप कार्यान्वितही झाले आहेत. जिल्ह्यात १०४० सौरकृषिपंप वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ११४८ इच्छूक शेतकऱ्यांनी अर्ज केले. जिल्हास्तरीय समितीने १०८२ अर्ज मंजूर करून मागणीपत्र दिले. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे जिल्हास्तरीय निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेमार्फत दिले जाते. लाभपश्चात सेवा-लाभार्थ्यांना लाभ पश्चात सेवा देण्याची हमीही या योजनेत घेण्यात आली आहे. या सौरकृषिपंपाचा विमा काढण्यात आला आहे. विमा हप्त्याचा समावेश कर्जाच्या रकमेत करण्यात येतो.

चिखली तालुक्यातील धोडप गावातील शेतकरी प्रताप गुलाबराव कोल्हे यांच्या शेतात गेल्या ५ वर्षांपासून विहीर आहे. या विहिरीला पाणीही होते, मात्र केवळ हे दुर्गम क्षेत्र असल्याने या ठिकाणी वीजजोडणी मिळू शकत नव्हती. अशा स्थितीत डिजेल पंप वापरणेही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. अखेर शासनाच्या सौरकृषिपंप योजनेमुळे त्यांच्या समस्येवर उत्तर सापडले. कोल्हे यांच्या शेतात ५ अश्वशक्तीचा पंप बसवला असून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा हा पंप आहे.

त्यासाठी त्यांना केवळ ३३ हजार ७५० रुपये भरावे लागले. इतर ३० केंद्र शासनाने तर राज्य शासनाने ५ टक्के आणि महावितरण मार्फत ६० टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com