छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क परिपूर्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून, त्याचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मराठा मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. राज्य शासनाने उच्चशिक्षणासाठी शिक्षण शुल्क परिपूर्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश केल्यामुळे आर्थिक मागास समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

तसेच, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. परंतु, वसतिगृहाचे बांधकाम होण्यास वेळ लागणार असून, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने द्यावा. तसेच, या वसतिगृहामध्ये पहिल्या टप्प्यात १०० मुले व ५० मुलींसाठीची सोय असावी. आवश्यकतेनुसार ही संख्या नंतर वाढविण्यात यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तरुणांना देण्यात येणाऱ्या दहा लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य शासन देणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया महामंडळाने तयार करून पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी या वेळी दिल्या. तसेच, तरुणांना महामंडळामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात याव्यात, असे श्री. देशमुख यांनी या वेळी सांगितले.

सारथी संस्था स्थापण्यासंदर्भात अहवाल सहा महिन्यांच्या आत देण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. तसेच, कुणबी जात प्रमाणपत्र देणे, तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण आदी विषयांचाही आढावा घेण्यात आला.

या वेळी समितीचे सदस्य शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com