ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधी

ठिबक सिंचन
ठिबक सिंचन

पुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी यंदा, २०१७-१८ मध्ये तब्बल ७६४ कोटी उपलब्ध झाले आहेत. ठिबक योजनेच्या इतिहासात एवढा निधी प्रथमच मिळाला असून, आतापर्यंत २१६ कोटी रुपये वाटण्यात आले आहेत.  सूक्ष्म सिंचन योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात केंद्र शासनाने नियमावली कठोर केली आहे. अर्थात, शेतकऱ्यांसाठी मात्र भरपूर निधी मंजूर करून देण्याची काळजीदेखील प्रथमच घेतली गेली आहे. पाच एकरपेक्षा जादा शेतजमीन असल्याचे कारण दाखवून शेतकऱ्याला दहा टक्के कमी ठिबक अनुदान दिले जात होते. ती अटदेखील यंदा केंद्र सरकारने यंदा रद्द केली आहे.  "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेतील स्वतःचा वाटा म्हणून ३८१ कोटी रुपयांचा निधी यंदा दिला आहे. राज्य शासनाने यात आपला वाटा म्हणून २४० कोटी रुपये टाकले आहेत. राज्य शासनाने याशिवाय ठिबकची स्वतंत्र एक योजना १०० टक्के अनुदानावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून १४३ कोटी रुपये ठिबककरीता मिळाले आहेत. त्यामुळे एकूण ७६४ कोटी रुपयांचा निधी प्रथमच ठिबक योजनेसाठी उपलब्ध झाला आहे. इतका निधी ठिबकसाठी यापूर्वी कधीही मंजूर झालेला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.  ठिबकसाठी मंजूर निधी भरपूर असला तरी वापराच्या प्रमाणात निधीचे वितरण होत असते. त्यामुळे आतापर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ७६४ कोटी रुपयांपैकी ३७७ कोटी मिळाले आहेत. उर्वरित ३८७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले जाणार आहेत. "मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपले तरी उर्वरित ३८७ कोटी रुपये परत (लॅप्स) जाणार नाहीत. हा निधी पुढील आर्थिक वर्षातदेखील वापरण्याची मुभा असल्यामुळे शेतकऱ्यांना ठिबकसाठी पुढील वर्षीदेखील अनुदानाची अडचण येणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दीड लाख शेतकऱ्यांना लवकरच अनुदान राज्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना चालू वर्षात आतापर्यंत २१६ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. चार लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी ठिबक अनुदानासाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी २ लाख ५ हजार शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्वसंमती मिळाली आहे. अंदाजे दीड लाख शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवून बिलेदेखील सादर केली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत थेट बॅंक खात्यांत अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com