अॉगस्ट, सप्टेंबरमध्ये पडणार ९५ टक्के पाऊस

पाऊस
पाऊस

पुणे : मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९६ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी (ता. ३) जाहीर करण्यात आलेल्या सुधारित अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीइतका म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडण्याची व त्यात ९ टक्के कमी अधिक तफावत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका मानला जातो. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याची शक्यता ४७ टक्के, तर सरासरी इतका (९४ ते १०६ टक्के) पावसाची शक्यता ४१ टक्के आणि सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता १२ टक्के असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

जुलैअखेर देशात चांगला पाऊस  मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्य वगळता उर्वरित देशात सर्वदूर चांगला पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन महिन्यांतही पावसाच्या वितरणाची हीच स्थिती कायम राहणार असून, शेतीसाठी २०१८ चा मॉन्सून कृषी क्षेत्राला लाभदायक ठरणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या अवघा ३६ टक्के पाऊस पडला आहे. मेघालयमध्ये सरासरीच्या ५७ टक्के, अरुणाचल प्रदेशात ६३ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, नागलॅंडमध्ये ८० टक्के पाऊस झाला अाहे. तर पूर्व भारतातील बिहार राज्यात सरासरीच्या ७७ टक्के आणि झारखंडमध्ये ७६ टक्के पावसाची नोंद झाली. लक्षद्वीप बेटांवरही ५७ टक्के पाऊस पडला आहे.  महाराष्ट्रात सर्वसाधारण हजेरी  महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंतची सरासरी ५४३.८ आहे. त्या तुलनेत ६१३.८ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या उणे किंवा अधिक १९ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. विभागनिहाय पावसाचा विचार करता सर्वाच विभागात सर्वसाधारण पाऊस असून, मराठवाड्यात इतर विभागापेक्षा कमी (९१ टक्के) पाऊस पडला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १११ टक्के, तर कोकणात १२३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

राज्यात जुलैअखेर पडलेला पाऊस

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी
काेकण १८०९.१ २२१९.७ १२३
मध्य महाराष्ट्र ३८७.८ ४२८.९ १११
मराठवाडा ३३०.५ ३०१.१ ९१
विदर्भ ४७९.९ ५३३.४ १११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com