राज्यात मुबलक युरिया

राज्यात सर्वात जास्त युरियाचा पुरवठा ‘आरसीएफ’कडून होतो. आम्ही यंदा साडेसहा लाख टनाच्या आसपास युरिया पुरविणार असून, आतापर्यंत चार लाख टन पुरवठा केलेला आहे. पावसामुळे काही भागात पुरवठा करण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, आता राज्यात भरपूर युरिया असून उलट पाऊस नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झालेला आहे. - अतुल पाटील, उपमहाव्यवस्थापक, ‘आरसीएफ’
राज्यात मुबलक युरिया
राज्यात मुबलक युरिया

पुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून युरियाची खरेदी मंदावली आहे. त्यामुळे मराठवाड्यात हजारो टन युरिया पडून आहे. अशीस्थिती असूनही पुढील ४५ दिवसांत अजून पावणेचार लाख टन युरिया राज्यभर पाठविला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच कोणत्याही भागात टंचाई, लिंकिंग किंवा काळा बाजार होत असल्यास तातडीने कळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे.  राज्यात मॉन्सून वेळेत पोचण्याचे संकेत मिळत असल्यामुळे नगदी पिकांचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा युरियाचा वापर पाच टक्क्यांपेक्षाही जादा वाढू शकतो, असा अंदाज वर्तविला गेला होता. प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये युरियाचे साठे पडून असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे. केंद्र शासनाने राज्यासाठी १५ लाख टन युरिया मंजूर केला आहे. मात्र, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन दिवस रेल्वे रेक वाहतुकीत अडथळे आले होते. त्यामुळे आठवडाभर राज्यात खताचे रेक वेळेत गेले नाही. यामुळे खताची टंचाई तयार झाली होती. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, टंचाईचा आता कुठेही प्रश्नच उरलेला नाही. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळी दाखवत बहुतेक भागात रेक पाठविले. मालवाहतूकदारांचा संप सुरू असताना काही भागात जिल्हाधिकाऱ्यांना खताचा आढावा घेत खतांचे ट्रक रवाना केले. नंदूरबारला रेल्वेचा ट्रॅक खचल्यामुळे तयार झालेली समस्यादेखील दूर झाली आहे. त्यामुळे खानदेशातील पुरवठादेखील सुरळीत झालेला आहे.  ‘‘राज्यात सध्या हिंगोली, नांदेडला थोडी मागणी आहे. सोलापूरला अजिबात मागणी नाही. तसेच, नगर, नाशिक, सातारा, पुण्याच्या काही तालुक्यांमध्ये युरियाला अजिबात मागणी नाही. केवळ कोकण व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मागणी असून तेथे आम्ही मुबलक युरिया पाठवून दिला आहे,’’ असे कृषी विभागाने स्पष्ट केले.  मराठवाड्यात हजारो टन युरिया पडून असला तरी पाऊस झाल्यास पुन्हा शेतकऱ्यांची गर्दी उसळू नये, याकरिता कृषी विभागाकडून युरिया पुरवठ्याचे पुढील वेळापत्रकदेखील पाळले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार ३० ऑगस्टपर्यंत सव्वा लाख टन आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये अडीच लाख टन युरिया राज्यभर पाठविला जाईल.  शेतकऱ्यांनी ४५ किलोची निमकोटेड युरियाची गोणी २६७ रुपये किमतीला विकत घ्यावी. कोणत्याही भागात टंचाई, लिंकिंग किंवा काळा बाजार होत असल्यास कृषी विभागाला किंवा आयुक्तालयाला तातडीने कळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com