‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात अचूकता येणार

‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात अचूकता येणार
‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात अचूकता येणार

पुणे : कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात महत्त्वाचे स्थान आहे. या क्षेत्रांची जमीन व समुद्रावरील निर्मिती ही हवामानावर सतत परिणाम करत असते. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या निर्मितीचा अंदाज घेणे आणि देणे हे मोठे आव्हानात्मक असते, मात्र आता क्षेत्रनिर्मितीच्या पूर्वानुमानात अचूकता आणण्यासाठी ‘कपल्ड माॅडेल’चा वापर भारतीय हवामान विभागाने करणार अाहे. सध्या चक्रीवादळाचा अंदाज देण्यात या मॉडेलचा यशस्वी वापर झाला आहे. वातावरणीय हवामान घटक आणि समुद्राच्या स्थितीचा एकत्रितपणे विचार करून तयार करण्यात आलेल्या माॅडेलच्या मदतीने कमी दाबक्षेत्राचाही अचूक अंदाज बांधणे शक्य होणार आहे.  हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी हवामान विभागाकडून विविध माॅडेल्सचा वापर केला जातो. उच्च क्षमतेच्या या माॅडेल्समुळे कमी क्षेत्रावरील हवामानाचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. या माॅडेल्समधून हवामान घटकांची ठराविक वेळी सातत्याने मिळणारी शास्त्रीय माहिती (वेदर डाटा) साठविण्याची सोय नसल्याने अनेक माॅडेल्स ही सक्षमतेने कार्यरत नव्हती. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे (आयआयटीएम)मध्ये नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘प्रत्युष’ संगणकामुळे हा डाटा अाता साठविता येणार आहे. यापूर्वी चक्रीवादळाचे पूर्वानुमान देताना तापमान, वारे, आद्रता, हवेचा दाब, ढग, पाऊस वातावरणीय व समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, खोलीनुसार पाण्याचे तापमान, वाऱ्यांचा वेग, दिशा मापदंडाचा स्थितीचा विचार केला जात होता. मात्र चक्रीवादळाची सद्यःस्थिती, मार्गक्रमाणानुसार या मापदंडांचा डाटा (रिअल टाइम डाटा) मिळत नव्हता. उपलब्ध माहितीच्या आधारे दिले जाणारे चक्रीवादळाचे पूर्वानुमानही अचूक देता येत नव्हते. मात्र आता ‘रिअल टाइम डाटा’ अभ्यासून अचूक पूर्वानुमान देता येणार अाहेत. सध्या चक्रीवादळ आल्यानंतर हे माॅडेल कार्यान्वित केले जात अाहे. पुढील काळात सातत्याने निरीक्षणे नोंदविली जाणार असल्याने कपल्ड माॅडेलच्या माध्यमातून कमी दाबाच्या पूर्वानुमानातही अचूकता येणार असल्याचे हवामान अंदाज शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.  

मानवी हस्तक्षेप कमी होणार याशिवाय हवामान विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या हवामान बदल मापदंडाच्या माहितीमध्ये (डाटा) मानवी हस्तक्षेप कमी करून अचूकतेसाठी देशभरात १३० स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. वर्षभरात आणखी ५३० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, यात हवामान विभागाला डाटा पुरविणाऱ्या पार्टटाइम वेधशाळांमध्ये केंद्र सुरू करून पूर्णवेळ सातत्याने माहिती उपलब्ध होणार अाहे. विविध केंद्रांतून सध्या सॅटेलाइट जोडणीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा डाटा पुढील काळात जीपीएसच्या आधारे मोबाईल एसएमएसने मिळेल. कृषी हवामान सल्ल्यासाठी जमिनीची आर्द्रता, तापमान, पिकांच्या पानाचे तापमान, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात येण्यासाठी पानजवळची आर्द्रता यांच्या नाेंदी घेणारे सेन्सर बसविण्यात येणार अाहे. विमानांच्या उड्डाणांसाठी वैमानिकांना दृश्यता (व्हिजिबिलिटी) कळावी यासाठी ‘दृष्टी’ सेन्सर वापरण्यात येत आहे. तसेच चक्रीवादळातील वेगवान वाऱ्यांच्या नोंदी किनारपट्टीवरील ७० जिल्‍ह्यांमध्ये घेण्यासाठी हाय स्पीड रेकाॅर्डिंग सिस्टिम बसविण्यात येणार असल्याचे हवामान उपकरण शास्त्रज्ञांनी सांगितले.    प्रायोगिक तत्त्वावर तालुकास्तरीय अंदाज हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या अंदाजाची परिणामकारकता विश्‍वसनीयता वाढविण्यासाठी कमी अंतरावरील क्षेत्राचे पूर्वानुमान देण्यासाठी हवामान विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. हवमान विभागस्तरीय, जिल्हास्तरीय अंदाजापाठोपाठ आता प्रायोगिक तत्त्वावर तालुकास्तरीय अंदाज वर्तविण्यास सुरवात केली आहे. यात पाऊस, कमाल, किमान तापमान, ढगांचे अच्छादन, कमान किमान आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान बदलाच्या मापदंडांचा पाच दिवसांचा अदांज देण्यात येतो. पुढील काळात आणखी कमी क्षेत्रावरील अंदाज देणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

उष्णता, थंडीचाही अंदाज गेले काही वर्षांपासून माॅन्सूनच्या कालावधीत (जून ते सप्टेंबर) पडणाऱ्या पावसाचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागातर्फे दिला जात आहे. मात्र आता हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही हंगामांचेही अंदाज हवामान देणार आहे. नुकताच उन्हाळ्याकरिताचा मार्च ते मे या तीन महिन्यांचा अंदाज विभागाने दिला आहे.  असे आहे ‘कपल्ड मॉडेल’

  •    हवामानातील दोन प्रमुख घटकांच्या एकत्रीकरणामुळे यास ‘कपल्ड मॉडेल’ असे म्हटले जाते
  •    जमिनीवरील आणि समुद्रातील वातावरणीय घटक यांचा मॉडेलमध्ये एकत्रित वापर
  •    अंदाजातील अचूकतावाढीसाठी मॉडेलमध्ये ‘रियल टाइम डाटा’चा वापर
  •    वादळाची दिशा व बदलाची नोंद या मॉडेलद्वारे सलगतेने घेता येणार
  •    चक्रीवादळाच्या काळात पाऊस, वाऱ्याच्या वेगाचा अंदाज बांधता येणार
  •    मालमत्ता, जीवितहानीचे संभाव्य नुकसान टाळण्यास अंदाजाच वापर होणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com