शरद जोशी शेतकरीप्रणित शेतकरी संघटनेचे  अर्जुनतात्या बोराडे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले
शरद जोशी शेतकरीप्रणित शेतकरी संघटनेचे अर्जुनतात्या बोराडे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ठेवले नजरकैदेत

कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान मागील चार-पाच वर्षे झाले. याचा निषेध आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा व्हावी, म्हणूनच आम्ही मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. पोलिसांनी आम्हाला नजरकैदेत ठेवून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली आहे. - अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, नाशिक

जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी (ता.२२) आयोजिण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत आंदोलकांनी व्यत्यय आणू नये यासाठी शरद जोशी शेतकरीप्रणित शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांना एका द्राक्षाच्या मळ्यात निफाड पोलिसांनी सकाळीच नजरकैदेत ठेवले. 

बोराडे यांनी मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन रविवारी (ता.२१) शेतकऱ्यांना केले होते. लागलीच रविवारी बोराडे यांच्याकडे निफाड पोलिस दाखल झाले. सोमवारी (ता.२२) आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ, असे बोराडे यांना पोलिसांनी सूचित केले. त्यानुसार सोमवारी सकाळीच एक पोलिस कर्मचारी बोराडे यांच्या थेरगाव (जि. नाशिक) येथील निवासस्थानी दाखल झाला.

अर्जुनतात्या बोराडे व कार्यकर्ते संतू पाटील, केदू पाटील बोराडे, शंकर पुरकर यांना घेऊन संतू पाटील यांच्या द्राक्षाच्या मळ्यात पोलिस दाखल झाले. या मळ्यात या सर्वांना सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले; तसेच १२ ते १५ कार्यकर्त्यांना निफाड पोलिसांनी ताब्यात घेतले. सभेनंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, निषेध करण्याचा अधिकारही सरकारने हिसकावून घेतला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रकार हा लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधातला आहे, असे संघटनेचे पदाधिकारी  शशिकांत भदाणे, कडूअप्पा पाटील यांनी सांगितले.

`अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई` निफाड तालुक्यातील थेरगाव येथील शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अनेक आंदोलनात श्री. बोराडे सहभागी असतात. त्यांच्याकडून किंवा संघटनेकडून आंदोलन करण्याबाबत पोलिस यंत्रणेला समजले असता त्यांना नजरकैदेत ठेवले. सभा संपल्यानंतर त्यांच्या घरून पोलिस कर्मचारी निघून आले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com