संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे १२,४५० जागा

पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या १५३ खासगी महाविद्यालयांमध्ये यंदा १२ हजार ४५० जागा उपलब्ध असतील. कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांमधील २० टक्के जागा मॅनेजमेंट कोटा म्हणून संस्थाचालकांना भरता येणार आहेत. उर्वरित जागांचे वाटप ३० टक्के महाराष्ट्र कोटा व ७० टक्के कृषी विद्यापीठ कोटा असे होणार आहे. 

कृषी पदवीसाठी सामायिक प्रवेश परीक्षेतूनच (सीईटी) जागा वाटप होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात कृषी विद्याशाखेची सर्वाधिक म्हणजे ७४ खासगी महाविद्यालये असून जागा सात हजार ८९० आहेत.  त्याखालोखाल २५ खासगी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये एक हजार ५२० जागा आहेत. 

शासकीय महाविद्यालयांची संख्या यंदा ३४ असून जागा दोन हजार ७७७ आहेत. या महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के जागा आयसीएआरकडून भरल्या जातील. याशिवाय दोन टक्के जागा परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. त्यानंतर उरलेल्या जागांमध्ये ३० टक्के महाराष्ट्र कोटा असून ७० टक्के कोटा कृषी विद्यापीठांचा राहील.  राज्यात कृषी व संलग्न प्रत्येक महाविद्यालयात एक जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. या जागेवर जम्मू काश्मीरमधील स्थलांतरित नागरिकांचे मुले, लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे.

महाराष्ट्र सीईटीशिवाय जेईई, नीट, आयसीएआरच्या सीईटीमध्ये उमेदवाराने घेतलेल्या गटानुसार (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित) पात्रता ठरविली जाणार आहे. बारावी विज्ञानमध्ये आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण तर खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. सीईटीमधील संबंधित गटातील पर्सेंटाईल तसेच इतर अधिभार (यात शेतजमीन, बारावीतील व्यावसायिक-वैकल्पिक विषय, राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, क्रीडास्पर्धा, वादविवाद, निबंध, वक्तृत्व या राज्यपातळीवरील स्पर्धांचे गुण) विचारात घेवून विद्यार्थ्याची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, यंदा नोंदणीसाठी ‘सेतू असिस्टंट अडमिशन रजिस्टर’ म्हणजेच ‘सार’ नावाचे पोर्टल उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. आता प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम वेळापत्रकाकडे महाविद्यालयांचे लक्ष लागून आहे.

राज्यात अशा असतील कृषी पदवीच्या जागा  (कंसात महाविद्यालयांची संख्या)
विद्याशाखा  शासकीय खासगी
कृषी  २०१२ (१९)  ७८९० (७४)
अन्नतंत्रज्ञान ६४(१) १५२० (२५)
कृषी अभियांत्रिकी २४७(४) ८८०(१५)
जैव तंत्रज्ञान ८०(२)  १००० (१६)
उद्यानविद्या २०० (४) ५६० (१०)
कृषी व्यवसाय व्यवस्थापन ६०० (१२)
वनविद्या  ६४(२)
सामाजिक विज्ञान  ४०(१) 
पशुसंवर्धन ३०(१)
मत्सशास्त्र ४०(१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com