राज्यात संतापाची लाट

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सरकारवर टीकेची झोड
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सरकारवर टीकेची झोड

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सरकारवर टीकेची झोड मुंबई : सरकारी अनास्थेचे बळी ठरलेले धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाल्यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. राजकीय, सामाजिक, शेती क्षेत्रांसह सोशल मीडियातून या घटनेनंतर सरकारवर टीकेची झोड उठविण्यात अाली. सरकारी िनर्दयतेने एका ८० वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्यास आपल्या न्याय्य हक्कासाठी विष प्राशन करण्यास हतबल केले, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना याबाबत दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली अाहे. सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांची रविवारी (ता. २८) रात्री अखेर प्राणज्योत मालविली. न्याय मागण्यासाठी मंत्रालयात आल्यानंतर पदरी निराशा आल्याने धर्मा पाटील यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाटील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने जे. जे. रुग्णालयात हलवण्यात होते; मात्र पाटील यांचे रविवारी निधन झाले. धर्मा पाटील हे शेतकरी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील रहिवासी आहेत. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला अल्प मोबदला मिळाण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू होता. पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचे सरकारचे धोरण असताना पाच एकरसाठी केवळ चार लाख रुपये मोबदला त्यांना देण्यात आला. वाढीव मोबदला मिळावा, यासाठी पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत होते. तिथे काहीच दाद न मिळाल्याने त्यांनी सोमवारी मंत्रालय गाठले होते.

मंत्रालयात फेऱ्या मारूनही काम होत नाही, हे पाहून निराश झालेल्या पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केले होते. पोलिसांनी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, धर्मा पाटील यांना राज्य सरकारच्या वतीने १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. ते त्यांचा मुलगा नरेद्र पाटील यांनी नाकारले आहे. अनुदान नको, मोबदला द्या, अशी त्यांची मागणी आहे. तसेच जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरूपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, मंत्री जयकुमार रावल यांनी जे. जे. रुग्णालयात पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.

धर्मा पाटील यांचे नेत्रदान ! मृत्यूनंतर धर्मा पाटील यांनी नेत्रदान केले आहे. पाटील यांच्या डोळ्यांची तपासणी पूर्ण केल्यानंतर, डोळे प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. यानंतर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन धर्मा पाटील यांचे डोळे नेत्रहीन व्यक्तीला डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रत्यारोपण केले. सकाळच्या मिशन अवयवदान मोहिमेला प्रतिसाद देत त्यांच्या मुलाने धर्मा पाटील यांचे अवयवदान केले आहे.  धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला, तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे.  - धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते विधान परिषद जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे. - अशोक चव्हाण,  प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. एजंट मध्यस्थी दिला नसल्यामुळे फक्त ४ लाख भरपाई दिली गेली. - खासदार राजू शेट्टी अाज शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नाही. कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. शेतकऱ्यांची मते घेऊन नंतर त्यांना मरणयातना द्याव्यात, अशी परिस्थिती निर्माण करण्यात अाली अाहे - प्रकाश आंबेडकर,  माजी खासदार, भारिप बहुजन महासंघ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com