मुदतीत शेततळे न खोदणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द नाहीत

विविध कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांनी अनुदानाचे मंजुरीपत्र असूनही तळे खोदता आलेले नाही. तळे खोदाईसाठी अनुदानाच्या तुलनेत शेतकऱ्याला मोठी गुंतवणूक करावी लागते, त्यामुळे बऱ्याच वेळा कामे रखडतात. मात्र, कामे सुरू करण्यासाठी पात्र अनुदानाच्या किमान २० टक्के रक्कम आगाऊ मिळण्याचीदेखील सुविधा आहे.
शेततळे
शेततळे

पुणे : राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून पूर्वसंमतीपत्र मिळवूनही ९० दिवसांत शेततळे न खोदलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही रद्द करण्यात आलेले नाहीत. शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक असून, ऑक्टोबरपासून राज्यात तळे खोदाईला वेग येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   राज्य शासनाच्या नियमानुसार ऑनलाइन शेततळ्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत तळे खोदाई करणे बंधनकारक असते. मात्र, विविध कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांनी अनुदानाचे मंजुरीपत्र असूनही तळे खोदता आलेले नाही. तळे खोदाईसाठी अनुदानाच्या तुलनेत शेतकऱ्याला मोठी गुंतवणूक करावी लागते, त्यामुळे बऱ्याच वेळा कामे रखडतात. मात्र, कामे सुरू करण्यासाठी पात्र अनुदानाच्या किमान २० टक्के रक्कम आगाऊ मिळण्याचीदेखील सुविधा आहे.  ‘‘यातील काही शेतकरी खरिपाच्या काढणीनंतर खोदाई सुरू करतील असा अंदाज आहे. मात्र, खोदाई शक्य नसलेल्या शेतकऱ्यांकडून तसे एक इच्छापत्र घेतले जाईल. त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा अर्ज मंजूर करणे सुलभ होईल,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.   मागेल त्याला शेततळे योजनेसाठी राज्य शासनाकडून ५० हजार रुपये कमाल अनुदान मिळते. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिलेली नाही. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनाच याआधी शेततळे मंजूर केले जात होते. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आली असून, कोकणात किमान २० गुंठे आणि इतर भागांत किमान ६० गुंठे जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अनुदान मिळवू शकतात.  ‘‘आतापर्यंत आम्ही ४७ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०२ कोटी रुपयांचे अनुदान जमा केले आहे. आतापर्यंत दोन लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. प्रांताधिकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीने त्यापैकी एक लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत,’’ अशी माहिती राज्याचे मृदसंधारण संचालक डॉ. के. पी. मोते यांनी दिली.   ‘‘ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी तळ्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यामुळे अनुदान मिळण्यात अडचणी येणार नाहीत,’’ असेही मृदसंधारण विभागाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com