नगर जिल्ह्यात पंचनाम्यानंतर कापसाचे क्षेत्र वाढले

बोंडअळीचा प्रादुर्भाव
बोंडअळीचा प्रादुर्भाव

नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा कापसाची एक लाख २५ हजार १३४ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली. खरिपाच्या शेवटी प्रशासनाचा तसा अहवाल आहे. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यात सुमारे पंचवीस हजार हेक्‍टरने क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे. प्रशासनाने एक लाख ५० हजार ३७९ हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे केले आहे. हा चमत्कार झाला कसा असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

जिल्ह्यामध्ये पाथर्डी, शेवगाव, जामखेड वगळता अन्य तालुक्‍यांत कापसाचे पीक घेतले जात नव्हते. अलीकडच्या दहा वर्षांत मात्र कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. चार वर्षांपूर्वी प्रशासनाच्या लेखी कापसाचे सरासरी क्षेत्र साठ हजार हेक्‍टर होते. मात्र अलीकडे एक लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस उत्पादन होऊ लागल्याने दोन वर्षांपूर्वी साठ हजारांवरून ते सरासरी एक लाखावर गेले.
तीन तालुक्‍यांत मर्यादित न राहता आता उसाच्या जिल्ह्यामध्ये अकोले वगळता सर्वच्या सर्व तेरा तालुक्‍यांत कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र बोंड अळी, लाल्या व अन्य कीड -रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. 
 
यंदा जिल्ह्याभर कापसावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम झाला. बहुतांश ठिकाणी सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले. राज्यातच सगळ्या ठिकाणी बोंड अळीमुळे कापसाचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची सरकारने घोषणा केली. त्यानुसार शेतात जाऊन कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
 
त्यानुसार जिल्हाभरात पंचनामे होऊन ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवालही शासनाला कळवला गेला आहे. मात्र खरीप अहवाल आणि प्रशासनाने केलेले कापसाचे पंचनामे यात बरीच तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
प्रशासनाच्या खरीप अहवालानुसार यंदा एक लाख २५ हजार १३४ हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली आहे. मात्र बोंड अळीच्या नुकसान झाल्याबाबत जिल्हा प्रशासनाने २ लाख १८ हजार ८२१ शेतकऱ्यांच्या एक लाख ५० हजार ३७१ हेक्‍टर क्षेत्रावर पंचनामे केले आहेत.
 
त्यातील एक लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांच्या एक लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टर क्षेत्राचे बोंड अळीमुळे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. लागवड आणि पंचनाम्याचा अहवाल पाहता २५ हजार २३७ हेक्‍टर क्षेत्र पंचनाम्यात वाढले आहे.
त्यामुळे खरीप पेरणी अहवालातील आकडा खरा की पंचनाम्याचा आकडा खरा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
कापसाचे पंचनामे झालेले क्षेत्र (कंसात लागवड क्षेत्र) हेक्‍टर ः नगर ः ३४४५ (१४३७), पारनेर ः १८४ (१४), श्रीगोंदा ः २८७७ (१६६८), कर्जत ः ९९९० (८२८२),जामखेड ः ५५३० (५५३०), शेवगाव ः ४७१९२ (४३,२३१), पाथर्डी ः ३७१९१ (२५,८०३),नेवासे ः २१९०६ (२१,१८७), राहुरी ः १०२२२ (१०,२२२), संगमनेर ः ११२७ (४९८), कोपरगाव ः ४७३० (३१०६), श्रीरामपूर ः ४८०४ (३४५७), राहाता ः ११७८ (६९९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com