नांदेड, परभणीत पावसामुळे मुगाच्या शेंगांना फुटले कोंब

पावसात भिजल्याने मुगाच्या शेंगांना फुटले कोंब
पावसात भिजल्याने मुगाच्या शेंगांना फुटले कोंब

परभणी ः दीर्घ पावसाच्या खंडानंतर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या मुगाच्या शेंगांना झाडावरच मोड फुटले आहेत. मुगाच्या दाण्याची प्रत खराब झाली आहे. पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट येत आहे. त्यात आता अतिवृष्टीमुळे डागील झालेल्या मुगाची बाजारात कमी दराने विक्री करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.

या तीन जिल्ह्यांत मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६७ हजार ९७ हेक्टरवर यंदा पेरणी झाली. विविध कारणांनी मुगाच्या क्षेत्रात घट होत आहे. यंदा जून महिन्याच्या सुरवातीला पेरणी केलेल्या मुगाला पावसाच्या दीर्घ खंडामुळे पाण्याचा ताण बसला. परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उतारा घटला. आता सुगी सुरू झालेली असतानाच गेल्या आठवडाभरात अनेक मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला.

सततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या मुगाच्या शेंगाची काढणी करता आली नाही. मजुरांच्या कमतरेतमुळेही काढणीस उशीर झाला. परिपक्व होऊन उभ्या पिकांवर वाळलेल्या शेंगातील मुगाचे दाणे सततच्या पावसात भिजून त्यांना मोड फुटले आहेत. वादळी वाऱ्यामुळे पीक आडवे झाले. पुराचे पाणी शिरुन वाहून गेले.

अनेक भागात शेंगांना मोड फुटले नसले तरी भिजल्यामुळे शेंगातील दाणे डागील झाले आहेत. डागील मुगाची व्यापारी भाव पाडून खरेदी करतात. गतवर्षी देखील अनेक तालुक्यात ऐन काढणीच्या काळात पाऊस झाल्यामुळे मूग उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यंदा देखील गतवर्षीप्रमाणेच मुगाची स्थिती झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

मजलापूर (ता. पूर्णा) येथील शेतकरी बाळासाहेब हिंगे म्हणाले चार एकर मूग काढणीस आला आहे. परंतु सततच्या पावसामुळे शेंगा झाडावरच भिजून मोड फुटले आहेत. सावंगी (ता. लोहा) येथील शेतकरी अंकुश वानखेडे म्हणाले, अतिपावसामुळे कपाशीच्या पिकाला मर लागलेली आहे. दीड एकर मूगाची काढणी न करता आल्याने पावसात भिजून शेंगा खराब झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com