वीज कंपनीविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यात जनक्षोभ

वीज कंपनीविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यात जनक्षोभ

बुलडाणा : एकीकडे रब्बी हंगाम जोरावर आलेला असताना वीज कंपनीकडून थकीत देयक वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. याविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी जनक्षोभ उसळत आहे. मलकापूर, नांदुरा तालुक्यातील आंदोलनानंतर आता चिखली तालुक्यात आंदोलनांचे लोण पोचले. मंगळवारी (ता.२६) रात्री चिखली तालुक्यातील केळवद येथील वीज उपकेंद्रात संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कार्यालयात जाळपोळ केली. या आंदोलनानंतर वीज अधिकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला.

वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे केळवद कार्यालयाअंतर्गत असलेल्या केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, गिरोला, हातणी या गावांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पाच दिवसांपासून ठप्प झाला होता. या गावांमधील गहू, हरभरा, मका, कांदा व भाजीपाल्याची पिके धोक्यात आली होती. महावितरणने अचानकपणे सरसकट कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने पेच बनला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंद्रे यांच्यासह केळवद येथील कार्यालय गाठले; परंतु तेथे कोणताही अधिकारी, कर्मचारी नव्हता. थोड्या वेळाने बुलडाणा येथून कार्यकारी अभियंता श्री. रामटेके तेथे पोचले. त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात केळवद येथील कार्यालयास आग लावली. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपयपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्याला येथून हलू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याने खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

नांदुऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन वीजप्रश्नावर नांदुरा येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. काँग्रेस नेत्यांनी वीज कार्यालयास तालाठोको आंदोलन केले; तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्लाबोल आंदोलन होते.

उपकेंद्राच्या जाळपोळप्रकरणी गुन्हे दाखल दोन दिवसआधी मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावर कार्यालयाची जाळपोळ केल्याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आंदोलक अ‍ॅड. हरीश रावळ यांच्यासह राजू पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, विजय पाटीलसह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडल्याने आंदोलन होऊन तोडफोड करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com