मराठवाड्यात मोर्चा, रास्ता रोकोच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध

मंठा येथे कडकडीत बंद
मंठा येथे कडकडीत बंद

औरंगाबाद  : पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने काँग्रेसतर्फे सोमवारी (ता.१०) भारत बंदची हाक देण्यात आली. या ‘बंद’ला औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत विविध ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरग्यात बससेवा प्रभावित झाली होती. मोर्चा, निषेध फेरी, रास्ता रोकोच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

औरंगाबाद येथे पेट्रोल पंपांसमोर आंदोलन ‘बंद’चा भाग म्हणून महागाईच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात औरंगाबाद शहरातील विविध पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात आले. मुकुंदवाडी पेट्रोल पंपासमोर प्रदेश प्रवक्‍ते श्री. सावंत, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वात धरणे देत घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीत उभे राहून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमधील एपीआय कॉर्नर येथील पेट्रोल पंपासमोर काॅंग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ‘बंद’ला काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.

जालन्यात काँग्रेसच्या वतीने मोर्चा जालना जिल्ह्यातील मंठा, अंबड, परतूर येथे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. मंठा शहरात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व ठप्प होते. तळणी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. कुंभार पिंपळगाव परिसरात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भोकरदन येथे रॅली काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे सिल्लोड, बुलडाणा, जाफ्राबाद आदी भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. परतूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मंठा शहरासह तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मंठा तालुक्‍यात निषेध फेरी काढण्यात आली होती. बदनापूर येथेही ‘बंद’ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. आष्टी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जालन्यातही काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

लातूरमध्ये चांगला प्रतिसाद  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने घोषित ‘बंद’ला लातूर शहर आणि जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ, अडत बाजार, सराफ बाजार, कापडलाइन कडकडीत बंद होती. महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला. जिल्ह्यात आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शहरातील उषाकिरण पेट्रोल पंपावरील आंदोलनात अमित देशमुख यांनी सहभाग घेतला.

सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोटारसायकल रॅली काढून जागर करण्यात आला. शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय, क्‍लासचा ‘बंद’मध्ये सहभाग होता. निलंग्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढला होता. देवणी येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले, तर औसा येथे भव्य रॅली काढण्यात आली. उदगीर, शिरूर अनंतपाळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकूर, निलंगा भागात बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

  उस्मानाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद उस्मानाबाद जिल्हा, शहरासह तालुक्‍यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील उमरगा, परांडा, वाशी, मुरूम येथे कडकडीत बंद  पाळण्यात आला. तुळजापूर, कळंब येथे ‘बंद’चा फारसा परिणाम दिसून आला नाही. मुरूम येथे निषेध फेरी काढण्यात आली. उमरगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. तुळजापूर, लोहारा, कळंब, भूम येथे ‘बंद’चा फारसा परिणाम दिसून आला नाही. उमरगा तालुक्‍यात बसफेऱ्या बंद होत्या. जिल्ह्यातील काही खासगी शाळांनीही ‘बंद’च्या निमीत्ताने सुटी जाहीर केली होती.

बीड जिल्ह्यात दुचाकी फेरी बीड : इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व इतर पक्षांनी सोमवारी (ता. १०) पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर बीड शहरात अल्पप्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता बाजारपेठ सुरू राहिली. ‘बंद’चे आवाहन करत माजलगाव, वडवणी, केज व बीडमध्ये दुचाकी आणि पायी फेऱ्या काढण्यात आल्या. महागाईचा निषेध करून शासनाविरोधी घोषणाही देण्यात आल्या. या काळात काही वेळेसाठी बंद दिसलेली दुकाने काही वेळातच पुन्हा उघडण्यात आली. बीड, परळी, अंबाजोगाईसह काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com