...अन्यथा रुमण्याचा वापर

वीज दरवाढीविरोधात येथील आझाद मैदानात इरिगेशन फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
वीज दरवाढीविरोधात येथील आझाद मैदानात इरिगेशन फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी आणि पेन्शन आणि कृषी पंपधारकांवरील अन्यायी वीज दरवाढ रद्द न केल्यास भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी रुमण्याचा वापर करावा, असे आवाहन जनता दल (संयुक्त) प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले यांनी मंगळवारी (ता. २७) केले. वीज दरवाढीविरोधात येथील आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.   महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज दरात १ रुपये १६ पैशांवरून १ रुपये ९७ पैसे इतकी दरवाढ केली. ‘महावितरण’ने १४० ते २७४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ केल्याने पोकळ थकबाकी वाढली आहे. त्यावर कृषी संजीवनी योजना लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही योजना फसली असून, सात लाख शेतकऱ्यांनी ३६१ कोटींची वसुली झाली आहे. म्हणजे एकूण थकबाकीच्या ३.३ टक्के वसुली झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी अॅड. भोसले म्हणाले, की पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच अन्यायी वीज दरवाढ रद्द केली जात नाही, तोवर राज्यातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही. शेतकरी संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत गप्प बसणार नाही. कृषिपंपांची वीजबिले दुरुस्त करावीत आणि मगच वसुली करावी, राज्यभरातील शेतकऱ्यांची पेड पेंडिंग कनेक्शन तातडीने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या वेळी प्रा. एन. डी. पाटील, प्रताप होगाडे आदींची भाषणे झाली. या आंदोलनात राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com