दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

बुलडाण्यात दूध दरप्रश्नी आंदोलन पेटलेलेच

अकोला  ः दुधाला पाच रुपये दर वाढवून द्यावा किंवा अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध बंद अांदोलन दुसऱ्या दिवशीही (मंगळवारी) वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात पेटलेले होते. मंगळवारी (ता. १७) सकाळपासून या जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर दूध अोतून देण्यात अाले. दुसरीकडे रविवारी (ता.१५) मध्यरात्रीनंतर दूध नेणाऱ्या वाहनाची तोडफोड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करीत धरपकड सुरू केली. काही कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून अाहे.

‘स्वाभिमानी’च्या अांदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद रविकांत तुपकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यातून मिळत अाहे. पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड, रस्त्यावर दूध फेकणे, देवदेवतांना अभिषेक करणे असे अांदोलनाचे स्वरूप होते. वाशीम जिल्ह्यातील मालेगावमध्ये ट्रक पेटविण्याचा प्रकार घडला. मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात धाड, चिखली, बुलडाणा या ठिकाणी दूध पुरवठा बंद ठेवण्याचा प्रयत्न झाला.

धाडमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमर डेअरीसाठी दूध घेऊन जाणारे वाहन अडविले. त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यावर अोतून दिले. बुलडाणा शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ संघटक राणा चंद्रशेखर चंदन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अांदोलन केले. शहरात रस्त्यावर दूध अोतले. शासनाने दूधाला पाच रुपये दर वाढवून द्यावा अशी घोषणाबाजी केली. पोलिसांना या अांदोलनाची कुणकुण लागताच घटनास्थळी पोचून सर्व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.

रविवारी मध्यरात्रीनंतर मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ दुधाचे टँकर अडवून ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात अांदोलनाचे  रणशिंग फुंकले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी वाघजाळ फाट्यावर दुधाच्या टँकरच्या काचा फोडून काही पिशव्यातील दूध रस्त्यावर फेकले. याप्रकरणी ‘स्वाभिमानी’च्या १३ कार्यकर्त्यांवर बोराखेडी पोलिसांनी सोमवारी (ता.१६) रात्री गुन्हा दाखल केला.

रविवारी (ता.१५) रात्री १२ वाजेच्या सुमारास विकास डेअरीचे दूध घेऊन वाहन बुलडाण्याकडे जात होते. मोताळा-बुलडाणा मार्गावरील वाघजाळ फाट्यानजीक संतप्त कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवून काचा फोडल्या. यात तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्याचे पोलिस कान्स्टेबल संतोष सुरडकर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोताळा तालुकाध्यक्ष सय्यद वसीम, राणा चंद्रशेखर चंदन, प्रदीप शेळके, विजय बोराडे, शेख रफीक यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाअंतर्गत वाशीम जिल्ह्यात मालेगावमध्ये दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार कार्यकर्त्यांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मालेगाव येथील शेलू चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची सुरवात झाली होती. कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न केला असता मालेगाव पोलिसांनी चार कार्यकर्त्यांवर कलम ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com