हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही : मंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. शिवाय ज्या बागायती जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांच्या मोबदल्यात उत्तम जमीन देण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकरी आंदोलकांना दिले. 

खंडाळा तालुक्यातील (जि. सातारा) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.२१) मंत्रालयात मंत्री देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर श्री. देसाई यांनी ही माहिती दिली. खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करीत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. गेल्या १० वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करीत आहेत, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. मात्र, रविवारी मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या व्हॅनमधून सोमवारी मंत्रालयात आले.

या वेळी मंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. त्यानंतर श्री. देसाई म्हणाले, की खंडाळा टप्पा क्रमांक एकमधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५ टक्के परताव्याची जमीन, टप्पा दोनमध्ये दिली जाईल. टप्पा दोनमधील हरकती असलेल्या जमीन अधिग्रहित करणार नाही. अधिग्रहित बागायती जमिनीच्या मोबदल्यात उत्तर जमीन देण्यात येईल. टप्पा तीनमधील लाभ क्षेत्रातील जमीन वगळण्यात येईल. आतापर्यंत एकंदर ३९२६ नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात २ हजार ४९० स्थानिकांना रोजगार देण्यात आले आहेत. आणखी नोकऱ्या उद्योग खात्याकडून देण्यात येतील. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी गावांची पाहणी करून बैठक घेतील. या प्रकरणाच्या विलंबासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी-जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे करतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com