मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री उपोषण

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारपासून (ता. २०) बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे उपोषण होणार आहे. शांततेच्या मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने हे आंदोलन करणार असल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मोर्चाने घेतला होता. याचा एक भाग म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर चक्री उपोषण करणार आहे. समन्वयकांची बैठक औरंगाबाद येथे झाली होती. त्यात हा निर्णय घेतल्याचे मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. यापुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची बैठक औरंगाबाद येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, किशोर मोरे व अनिल पारगे उपस्थित होते.

कुंजीर म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना मदत आणि त्यांना सरकारी नोकरी मिळावी, अशा मागण्या आम्ही करीत आहोत. मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून, त्यासाठी पुढे काय करणार, हे लेखी आश्‍वासन द्यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी.

नऊ ऑगस्टला झालेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोडीची घटना असो वा शहरात ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये अनेक जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील काही जणांना जामीन मंजूर झाला असून, काहींना मिळायचा आहे. यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. आंदोलनात बाह्यशक्तींनी धुडगूस घातला होता. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शांताराम कुंजीर यांनी केली आहे.

आगामी आंदोलनांसाठी खास आचारसंहिता तयार केली आहे. त्याचे फलक लावूनच आंदोलने केली जातील. ज्यांना शांततेने आंदोलन करायचे आहे, त्यांनीच यात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्तेचे ठिय्या आंदोलनादरम्यान नुकसान झाले. त्यामुळे तेथे काच बसवून दिली आहे. पौड रस्ता येथे अश्रुधुराच्या नळकांडीचा मार बसल्याने एक मुलगी जखमी झाली होती. तिलाही मदत देणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com