साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले आहेत. बिजवडी येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला. बळिराजा शेतकरी संघटनेनेही ‘स्वाभिमानी’च्या दूध दरप्रश्‍नी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरप्रश्‍नी आंदोलनासाठी चांगली मोर्चेबांधणी केल्याने त्यास गावा-गावातून प्रतिसाद मिळू लागला आहे. अनेक ठिकाणी दूध दरासाठी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जनावरे व लेकराबाळांसह महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्याची दखल घेतल पोलिस प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता वाढू नये यासाठी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे.

दरम्यान बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनीही या दूध दरप्रश्‍नी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बिजवडी (ता. माण) येथे गुरुवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजता दूध दरवाढ करावी, या मागणीबरोबरच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या मुजोरीचा निषेध म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली दहा गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून देत आंदोलन केले.

या वेळी संजय भोसले म्हणाले, की दूधदरप्रश्‍नी राज्यभर आंदोलने सुरू असून, बिजवडीत बुधवारी न झालेल्या आंदोलनात दहिवडी पोलिसांनी मुजोरी दाखवत दडपशाहीने एका शेतकऱ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील हे दूध आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दूधदरवाढी संदर्भात व पोलिस प्रशासनाच्या मुजोरीविरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत असल्याचे निवेदन संजय भोसले व शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार श्री. पोटे यांना दिले. विजय गंगाराम भोसले, दिलीपराव भोसले, रंगाशेठ भोसले, डॉ. विलास पवार आदींसह शेतकरी या वेळी उपस्थित होते.

अतीत व परिसरातील शेतकरी व संघटनांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देऊन शासनाचा तीव्र निषेध केला. अतीत ग्रामस्थांनी दूध दरवाढ झालीच पाहिजे, असा नारा देऊन स्वयंस्फूर्तीने दूध संकलन न करण्याचा निर्धार केला. महेश जाधव, योगेश जगदाळे, राजेंद्र माने, तानाजी जाधव, राहुल जाधव, पैलवान नीलेश जाधव, रोशन निकम, अमित यादव, राज जाधव, नरेंद्र साळुंखे, सचिन जाधव, गणेश जाधव या वेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील घटलेल्या दूध संकलनाची स्थिती

  • रोजचे दूध संकलन ः  सरासरी २५ लाख ८२ हजार ८०० लिटर  
  • सोमवारी (ता. १६) संकलन न झालेले दूध ः १३ लाख ७७ हजार २०० लिटर
  • मंगळवारी (ता. १७) संकलन न झालेले दूध  ः २० लाख १६ हजार ७०० लिटर
  • बुधवारी (ता. १८) संकलन न झालेले दूध ः १९ लाख ५८ हजार ५०० लिटर
  • गुरुवारी सकाळी (ता. १९) संकलन न झालेले ः १३ लाख ६८ हजार २०० लिटर
  • दुधाची अंदाजे किंमत ः  सुमारे १२ कोटी ७६ लाख ९१ हजार ४०० रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com