राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश रस्त्यावर

कांदा विक्रीच्या नफ्यातून पाठवलेल्या सहा रुपयांतून मुख्यमंत्र्यांनी शेतीविषयक पुस्तकाचे वाचन करावे व शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. घरातील आठ सदस्यांचा खर्च सहा रुपयांत कसा भागवावा हा प्रश्नच आहे. - श्रेयस आभाळे, शेतकरी, अकलापूर, जि. नगर.
कांदा
कांदा

 पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेला कमी दर आणि दुष्काळी स्थिती, यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर गत सप्ताहात नाशिक, नगर, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी रास्ता रोको, कांदा रस्त्यावर ओतून तसेच मोफत कांदा वाटप करून आंदोलने केली. तसेच कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळावा, कांदा दर प्रश्नी सरकारने तातडीने तोडगा काढवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, निफाड या भागांत कांदा दरप्रश्नी राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलने केली. पारेगाव येथील शेतकरी वैभव खिल्लारे यांनी कांद्याला १८२ रुपये क्विंटल असा दर मिळाल्याने येवला बाजार समितीसमोर कांदा ओतून शासकीय धोरणाचा निषेध केला. तसेच या वेळी अन्य शेतकऱ्यांनी फरसाणसोबत कांदा खात आंदोलन केले. अंदरसूल येथील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी कांद्याला ५१ पैसे प्रतिकिलो असा दर मिळाल्याने विक्रीची २१६ रुपये रक्कम मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर केली. नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी कांदा विक्रीतून मिळालेली अत्यल्प रक्कम थेट पंतप्रधानांना मनीआॅर्डर केली.

नगर जिल्ह्यातही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. संगमनेर तालुक्‍यातील अकलापूर येथील श्रेयस संजय आभाळे या युवा शेतकऱ्याने ५१ गोण्या कांदा विक्री केला. सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात अवघे सहा रुपये उरले. ती रक्कम आभाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. नगर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला सहा क्विंटल कांदा विक्रीतून खर्च वजा जाऊन अवघा एक रुपया पदरात पडला आहे.

पुणे जिल्ह्यातील चाकण बाजारात नवा कांदा दाखल होऊ लागल्याने त्यास सहा ते आठ रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे, तर जुन्या कांद्याला तीन ते चार रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे चाकण बाजार समितीत जुना कांदा घेऊन आलेले मंचर येथील शेतकरी कैलास हुले यांचा वाहतूक खर्चही वसूल झाला नाही. कांदा साठवणूक करूनही उत्पादन खर्च मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शिरूर बाजार समितीत शनिवारी (ता. ८) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोफत कांदा वाटप आंदोलन करण्यात आले. ४५ हजार रुपये खर्च करुन उत्पादित केलेला कांदा १२ हजार रुपयांना विक्री झाला उलट तीन हजार रुपये व्याजाने घ्यावे लागले. त्यामुळे जैनकवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी दिनेश काळे यांनी बारामती येथील नगर परिषदेच्या चौकात फुकट कांदा वाटप केले. सोलापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने शासनाच्या धोरणांचा निषेध म्हणून दोन टन कांदा मोफत वाटप करण्यात आला.   या आहेत प्रमुख मागण्या

  • कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी.
  • कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे.
  • निर्यातीसाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत.
  • कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेच्या दरात वाढ करून सदर योजनेस दीर्घकाळ मुदतवाढ द्यावी.
  • कांदा निर्यातमूल्य शून्य करून निर्यातीसाठी १० टक्के अनुदान द्यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com