मराठा आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम

सातारा ः येथील बॉम्बे रेस्टारंट उड्डाण पुलावर आंदोलकांनी टायर पेटवून ‘रस्ता रोको’ केला.
सातारा ः येथील बॉम्बे रेस्टारंट उड्डाण पुलावर आंदोलकांनी टायर पेटवून ‘रस्ता रोको’ केला.

पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचे आक्रमक रूप मुंबईकरांनी बुधवारी (ता. २५) अनुभवले. आरक्षणाच्या मागणीसाठी दोन आंदोलकांचा मृत्यू झाल्यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. राज्यव्यापी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीदेखील अनेक भागांत जाळपोळ व ‘रास्ता रोको’ झाले. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार तसेच काही ठिकाणी अश्रुधुराचा वापर करावा लागला.      दरम्यान, आंदोलकांशी चर्चेस तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विदर्भासह मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. विदर्भात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे (कायगाव टोक, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर दुसरे आंदोलक जगन्नाथ सोनवणे (देवगाव रंगारी, ता. कन्नड) यांनी विष प्राशन केले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्यामुळे आंदोलक अस्वस्थ होते. अकोला, सातारा, जालना, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी बंद, मोर्चे तसेच रास्ता रोको करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या. सातारा भागात आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य करीत तुफान दगडफेक केली. पोलिस अधीक्षक संदीप पाटीलदेखील दगडफेकीत जखमी झाले. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सोलापूरच्या तुळजापूर नाका भागात एसटीवर दगडफेक झाली. सांगलीत मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. अहमदनगरच्या मनमाडरोड, कर्जत भागात तसेच, यवतमाळच्या उमरखेडमध्ये दगडफेक झाली. नाशिक जिल्ह्यातदेखील मराठा समाजाच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाज क्रांती मोर्चातर्फे मुंबई बंदची घोषणा केल्यामुळे सकाळपासूनच चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, ठाण्यासह नवी मुंबईत आंदोलक हळूहळू रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली. त्यानंतर आंदोलकांनी प्रथम ठाण्यात बसेसवर दगडफेक केली. मानखुर्दमध्ये बस पेटवून देण्यात आल्याने धावपळ झाली. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या दिशेने जाणारे महामार्गदेखील अडविण्यात आले. द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे हजारो तरुण रस्त्यावर आल्यामुळे महामार्ग ठप्प झाला. यावेळी आंदोलकांच्या दगडफेकीत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविले. हजारो आंदोलक रेल्वे मार्गांवरदेखील उतरल्यामुळे मुंबईची धमनी असलेली लोकल सेवा विस्कळित झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकात संतप्त आंदोलकांनी लोकलवर दगडफेक केल्याने प्रवासी भेदरले होते. दुपारी दोनच्या आसपास आंदोलकांनी बंद स्थगित केल्याची घोषणा केल्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, तरीही ठाण्यात काही ठिकाणी तोडफोडीचे प्रकार सुरू होते. लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्याचा प्रकार आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील झाला. बीडच्या गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक केली. यवतमाळच्या उमरखेड भागात माजी आमदार प्रकाश पाटील यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. धुळे शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी आरक्षणाबाबत मौनी ठरलेल्या आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांचीच पळापळ झाली. साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे यांनी भाषण करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी त्यांना रोखले. नेत्यांचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे आक्रमक रुप पाहून राज्य सरकार पुरते भयभीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसले. "मी तुमच्या हातापाया पडतो. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. पण, आंदोलन मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना करावे लागले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीदेखील,"तुमच्या मतांचा आम्हाला आदर असून, पूर्ततेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मराठा आरक्षणाला सरकार अनुकूल आहे. आंदोलकांनी जिवावर उदार होऊ नये, असे आवाहन केले. चंद्रकांतदादांचा माफीनामा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे. मराठा सामाजाच्या भावना दुखावतील असे मी बोललो नाही. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. मी तुमच्या हातापाया पडतो. पण, आंदोलन मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आंदोलनातील घडामोडी

  •  मुंबईत हिंसक घटनांमुळे बंद स्थगित
  •  राज्यात तिसऱ्या दिवशीही उग्र निदर्शने
  •  जाळपोळ, हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या घटना 
  •  औरंगाबादला आणखी एका आंदोलकाचा मृत्यू
  •  मुख्यमंत्री चर्चेस तयार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com