बळिराजा हा सायलेंट बाँब; अंत पाहिल्यास तो फोडू ः खासदार शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

पुणे  : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ऊन, वारा, पावसात राबणारे हे शेतकरी आता हक्क मागण्यासाठी कुणालाही शिंगावर घेणारी फौज बनली आहे. दुधाला भाव आणि ऊसाची थकीत एफआरपी न दिल्यास बळिराजाचा सायलेंट बाॅंब आम्ही कधीही फोडू, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

पुणे येथे दूध आणि ऊसदरप्रश्नी शुक्रवारी (ता.२९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विराट कैफियत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले काही शेतकरी तसेच महिलादेखील आसूड मारून सरकारच्या धोरणावर संताप व्यक्त करीत होत्या. पोलिसांनी कृषीभवनावरच मोर्चा अडविल्यानंतर खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.

खासदार शेट्टी यांचे शिष्टमंडळ त्यानंतर साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांना भेटले. २० जुलैपर्यंत जर राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी दिली नाही, तर मी २१ जुलैला पुन्हा येईन. त्या वेळी साखर कारखान्यांवरील महसुली मालमत्ता जप्तीचे आदेशपत्र (आरआरसी) घेऊनच मी जाईन. त्यानंतर आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठिय्या देवू. कारखान्यांची साखर विकून शेतकऱ्यांच्या रकमा दिल्याशिवाय आम्ही अजिबात मागे हटणार नाही, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. सरकारच्या विराेधात #स्वाभिमानी आसूड कडाडला...

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून जादा तोडणी व ऊस वाहतूक खर्च वसूल करू नये. ऊस दर नियंत्रण समितीने घेतलेले आधीचे नियम नव्या समितीने बदलण्याचा प्रयत्न केल्यास मी अजिबात खपवून घेणार नाही. तुम्ही नियम बदलल्यास आम्ही सरकार बदलू. मी पुढचा हंगामसुद्धा सुरू होऊ देणार नाही, असा इशारा श्री. शेट्टी यांनी सरकारला या वेळी दिला.

या शिष्टमंडळाने दुग्धविकास विभागालादेखील या वेळी निवेदन दिले. कर्नाटकप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना थेट बॅंक खात्यात पाच रुपये प्रतिलिटर अनुदान वर्ग करावे. तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या गायी कत्तलखान्याकडे जातील. त्यामुळे राज्याचा दुग्धविकास थांबेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. यावेळी दूध दरप्रश्‍नी १५ जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास १६ जुलैपासून एकही टँकर मुंबईकडे जाऊ दिला जाणार नाही, असा निर्णय श्री. शेट्टी यांनी जाहिर केला.

सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडे जर ६२ कोटींची एफआरपी थकीत असेल तर शेतकऱ्यांनी पहायचे कोणाकडे, असा सवाल करीत आम्ही एकदा सहकारमंत्र्यांना धरल्याशिवाय सोडणार नाही. दरोडेखोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्याचा हा प्रकार आहे. एफआरपी वेळेत न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांना नाहक व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची मुदतदेखील वाढवावी, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी या वेळी केली. 

या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, योगेश पांडे, जालिंदर पाटील, प्रकाश बालवडकर, राजेंद्र ढवाण पाटील तसेच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com