कृषी आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

कृषी आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी
कृषी आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुणे: कृषी खात्यात वर्षानुवर्षे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश दिल्यानंतर विनाकारण फाईल पेंडिग ठेवलेल्या अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांनी बैठक घेऊन अतिशय तिखट भाषेत काही अधिकाऱ्यांना झापल्याने कामचुकार कर्मचारी चांगलेच हादरले आहेत. कृषी आयुक्तालयातील निगरगट्ट कारभार हा राज्यभर सतत चर्चेचा विषय झाला आहे. अधिकारी कोणालाही जुमानत नसल्याचा पुरावा म्हणून तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या बदलीचा आजही उल्लेख केला जातो. काही अधिकाऱ्यांनीच ही बदली घडवून आणली होती. मधल्या काळात नवे आयुक्त श्री. सिंह यांनी समुपदेशन बदल्यांमध्ये आयुक्तांनी मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जॅक लावून हव्या तशा बदल्या करून घेतल्या होत्या. तसेच, बदल्या झाल्यानंतरदेखील शेकडो अधिकारी आपल्या पदाला चिकटून राहिले होते. त्यामुळेच श्री. सिंह यांनी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश दिल्यानंतर पळापळ झाली होती. कृषी आयुक्तालयात शासकीय योजना तसेच शेतकरी संबंधित कोणत्याही फाईल पेंडिंग ठेवू नका, अशा लेखी सूचना यापूर्वीच श्री. सिंह यांनी दिल्या होत्या. तरीही काही महाभागांनी आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सतत दोन बैठका घेऊन आयुक्तांनी प्रलंबित फाईल्सचा आढावा घेतला. ‘‘आयुक्त आढावा घेत असताना एक कर्मचारी बेधडक फोनवर बोलत होता. आयुक्तांनी या कर्मचाऱ्याला एक तास बैठकीत उभे राहण्याची शिक्षा दिली. काही कामचुकार कर्मचाऱ्यांना अतिशय तिखट भाषेत आयुक्त बोलल्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ‘‘आपण शेतकऱ्यांचे नोकर आहोत. शेतकऱ्यांसाठी आपण किती काम करतो. मिळणाऱ्या पगाराची जाणीव ठेवून आपण काम केले पाहिजे. केवळ दिवस काढण्यात काहीही उपयोग नाही. तुमच्या काही अडचणी असल्यास मला सांगा पण कामे प्रलंबित राहता कामा नये,’’ अशी भावना आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

कृषी आयुक्तांनी अशा दिल्या सूचना

  • कामावर वेळेत या आणि वेळेच्या आधी कार्यालय सोडू नका
  • शेतकऱ्यांची कोणतेही कामे मुदतीत झालीच पाहिजे
  • कामचुकार कर्मचारी शोधण्यासाठी सर्व ठिकाणी थंब पंचिंग मशीन लावा
  • काय काम करतात, काय पेंडिंग ठेवले आणि का पेंडिंग ठेवले याचा अहवाल सादर करा
  • क्षेत्रिय पातळीवरदेखील पेंडन्सी नको. आयुक्त स्वतः तपासणी करणार
  • आढावा बैठकीला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल मागविले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com