शेतीच्या सर्वांगीण सुधारणेसाठी प्रयत्न करू : महसूलमंत्री पाटील

कोल्हापूर कृषी महोत्सवाचे उदघाटन
कोल्हापूर कृषी महोत्सवाचे उदघाटन
कोल्हापूर : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावांमध्ये शाश्वत पाणीसाठे करण्याबरोबरच शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा प्रभावी अवलंब करून पीक उत्पादन वाढविण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. केवळ निधी न देता वेगवेगळ्या कल्पनांना यापुढे शासनातर्फे वाव देण्यात येईल. त्यातून शेतीच्या सर्वांगीण सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मेरी वेदर मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ४) श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
 
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हापरिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सुरेश पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते. बुधवारपर्यंत (ता. ७) हा महोत्सव चालणार आहे.
 
श्री. पाटील म्हणाले, की पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना उपलब्ध करून देण्यासाठी ठिबकचा कोठा शासनाने वाढविला आहे. ठिबकसाठी शेतकऱ्यांना सरसकट अनुदान उपलब्ध व्हावे यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे दिला जाईल.
 
जिल्ह्यातील अधिकाधिक शेती ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी कृषी विभाग तसेच अन्य सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिबक सिंचनाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला जाईल. यामध्ये ४० ते ५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किमान १५० एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा एकत्रित प्रकल्प हाती घेतल्यास शेती उत्पन्न वाढण्याबरोबरच उत्पादित शेतीमालाला बाजारपेठाही उपलब्ध होतील. यादृष्टीने ठिबक सिंचनाची तसेच शेतीमध्ये शेडनेटची नवी योजना राबविण्यावर अधिक भर दिला जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
 
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून २६०० कोटींची ठिबक सिंचन अनुदान योजना राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे कृषी राज्यमंत्री श्री. खोत यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना शेती अवजारे खुल्या बाजारातून घेण्यासाठी अनुदान योजना प्रभावीपणे राबविली आहे. ठिबक सिंचनासाठी यंदा राज्याला ७०० कोटी रुपये उपलब्ध होत असून, शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाची ऑनलाइन प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवली जाईल, असे श्री. खोत यांनी या वेळी सांगितले.
 
या वेळी विविध पीक स्पर्धेत यश मिळविलेल्या शेतकऱ्यांचा व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी स्वागत केले. कृषी उपसंचालक सौ. भाग्यश्री पवार- फरांदे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com