पावसाअभावी खरीप उत्पादन घटणार

राज्याचे प्रमुख खरीप पीक असलेले सोयाबीन सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे उत्पादनात काही भागात ३०-४० टक्के फटका बसेल. कपाशीवरील बोंड अळीला कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून रोखण्यात कसेबसे यश आले. मात्र, पावसाअभावी कपाशीसह इतर पिके संकटात आहेत.कीडरोगांचा फैलाव आणि उत्पादनात घट अशा दुहेरीसंकटाच्या उंबरठ्यावर आहेत. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
नांदुरा, जि. बुलडाणा ः येथे अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पीक असे सुकू लागले अाहेत.
नांदुरा, जि. बुलडाणा ः येथे अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पीक असे सुकू लागले अाहेत.

पुणे : राज्यात दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या पावसाने खरीप अन्नधान्याच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. "पावसाअभावी राज्याच्या काही भागांमधील पिकांची वाढ खुंटली आहे," असे कृषी विभागाचेदेखील म्हणणे आहे. राज्याच्या ३० तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस ऑगस्टच्या पंधरवड्यांपर्यंत नव्हता. त्यामुळे पिके जळणे किंवा कीडरोगांचा फैलाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळली होती. त्यानंतर मात्र, पुन्हा १५-२० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरिपावर संकट आले आहे. 

शेतकऱ्यांनी राज्यात यंदा सोयाबीनची ३९ लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. मेहेत्रे म्हणाले, की पावसाअभावी सोयाबीन लागवड पट्ट्यात जमिनीचा ओलावा घटला आहे. दुसऱ्या बाजूला तापमान वाढते आहे. यामुळे दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात ४०-५० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.

राज्यात यंदा उत्पादनात किती घट येईल, याविषयी कृषी विभागाला अजून काहीही स्पष्ट करता आलेले नाही. "आम्ही यंदाचा पीक उत्पादनाचा अजून पहिला अंदाज काढलेलाच नाही. त्यामुळे आधीच्या अंदाजात आता किती घट येईल हे सांगण्याचा प्रश्नच नाही. तसेच, गेल्या वर्षीच्या खरिपाचा तिसरा आणि चौथा अंदाजदेखील आम्ही जाहीर केलेला नाही. त्यामुळे उत्पादनाच्या अंदाजाविषयी आम्ही काहीही माहिती देऊ शकत नाही," असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या म्हणण्यानुसार, "पिकांना आता एका चांगल्या पावसाची गरज आहे. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार अनेक भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस चांगला दिसतो. मात्र, प्रत्यक्ष गावे व शेतशिवारांमध्ये फिरल्यानंतर मोठे तलाव व शेततळी कोरडी असल्याचे दिसते. आकडेवारी वेगळी व चित्र वेगळे अशी स्थिती असल्यास शेतकऱ्यांसमोरील समस्या आणखी वाढतात."

शेतकऱ्यांनी राज्यात यंदा खरिपाच्या १४० लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १३८ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण केला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा १४१ लाख हेक्टरच्या आसपास झालेला होता. मराठवाड्यात सरासरी पाऊस चांगला असला तरी काही तालुक्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. सोलापूरसह नाशिक, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे.  

जवळपास १०० तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झालेला नाही. "नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी भात, मूग, उडीद आणि जिरायती कपाशीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातदेखील पुरेसा पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सांगली भागात पिकांची वाढ खुंटली आहे," असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. औरंगाबाद विभागात कापूस, मका, मुगाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात तर पावसाअभावी बाजारी, सूर्यफुलाचे प्लॉट सुकत असून भुईमूग, कापूस आणि तुरीची अवस्थादेखील बिकट आहे. 

‘‘पाण्याचे साठे असलेले शेतकरी सध्या आपआपली पिके वाचवत आहेत. मात्र, पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात बेपत्ता मॉन्सूनमुळे मोठी घट अपेक्षित आहे. नगर जिल्ह्यात बाजरी, मका, सोयाबीन आणि सोलापूर भागात मूग व उडदाच्या उत्पादनाला झटका बसणार आहे," असे सूत्रांनी स्पष्ट केले.  मराठवाड्यात बोंड अळीसह इतर किडींचा प्रादुर्भाव बेपत्ता पावसाच्या एका संकटाला तोंड देणारा मराठवाड्यातील शेतकरी कीडरोगांनी देखील हैराण झालेला आहे. अनेक फवारण्या करूनही काही गावांमध्ये बोंड अळी पक्की ठाण मांडून बसली आहे. "लातूर विभागात बोंड अळीसह रसशोषक किडींचा फेलाव काही गावांमध्ये आहे. सोयाबीनवर पानेखाणारी अळी, उंटअळी, पाने गुंडाळणारी अळी, चक्री भुंगेरे दिसत आहेत. औरंगाबाद विभागात मूग, उडीद, सोयाबीन आणि मक्यावर किडी आढळल्या आहेत. मात्र, या किडींमुळे कोणत्याही जिल्ह्यात मोठे नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com