जलयुक्तच्या कामावरील बहिष्कार मागे

जलयुक्तच्या कामावरील बहिष्कार मागे

परभणी :  तीन कृषी सहायकांचे निलंबन गुरुवारी (ता. २८) रद्द करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायकांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांवर सोमवार (ता. १८) पासून टाकलेला सामूहिक बहिष्कार मागे घेतला असल्याची माहिती कृषी सहायक संघटनेच्या सूत्रांनी दिली.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१६-१७ मध्ये निवड झालेल्या १६० गावांतील अपूर्ण राहिलेल्या कामांबद्दल जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसांचा खुलासा सादर न करणाऱ्या जिंतूर तालुक्यातील दोन आणि पूर्णा तालुक्यातील एक एकूण तीन कृषी सहायकांवर लातूर येथील कृषी सहसंचालकांनी निलंबनाची कार्यवाही केली होती.

परंतु जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली असताना, कृषी सहायकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीची आहे. त्यामुळे निलंबन रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवार (ता. १८) पासून जिल्ह्यातील २३५ कृषी सहायक आणि ६२ कृषी पर्यवेक्षकांनी जलयुक्त शिवार अभियानच्या कामांवर सामूहिक बहिष्कार टाकला होता.

यामुळे २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या १२८ गावशिवारांतील कामांच्या नियोजनाचे वेळपत्रक कोलमडले होते. तसेच २०१६-१७ मधील पूर्ण झालेल्या कामांचे जीओ टॅगिंग करण्याचे कामदेखील थांबले होते.

निलंबित करण्यात आलेल्या कृषी सहायकांनी खुलासा सादर केल्यानंतर, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनंतर गुरुवारी (ता. २८) लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक आर. एस. भताने यांनी कृषी सहायकांचे निलंबन रद्द केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com