शेतात फक्त पऱ्हाट्या अन् तुऱ्हाट्या शिल्लक
शेतात फक्त पऱ्हाट्या अन् तुऱ्हाट्या शिल्लक

शेतात फक्त पऱ्हाट्या अन् तुऱ्हाट्या शिल्लक

दुष्काळामुळे खरीप ज्वारीचा कडबा उपलब्ध झाला नाही. गवत लवकरच वाळून गेले. सोयाबीनची गुळीदेखील नाही. त्यामुळे जनावराच्या चाऱ्याची समस्या गंभीर होणार आहे. चारा छावणी सुरू करण्याची वेळ येणार आहे. - ओंकार कोरे, राणीसावरगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी

परभणी ः मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच संमदी पिकं वाळून गेलीत. शेतात कामच शिल्लक राहिली नसल्यामुळे फॅक्टीवर जावं लागणार आहे. या वयात ऊस तोडावा लागणार, अशा शब्दांत पिंपळदरी (ता. गंगाखेड) जवळील निळा नाईक तांड्यावरील ज्येष्ठ शेतकरी सीताराम चव्हाण यांनी व्यथा सांगत मन मोकळं केलं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याची दोन भागांत विभागणी केली जाते. उत्तरेकडील महातपुरी, गंगाखेड मंडळातील गोदावरी नदी काठची काळी कसदार जमीन असलेला एक भाग तर राणीसावरगाव, माखणी मंडळातील बालाघाट डोंगर रांगांतील खडकाळ, उथळ, माळरानाचा दगडगोट्यांची जमीन असलेला दुसरा भाग. डोंगराळ भागातील गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील शेतकऱ्यांची सारी भिस्त खरीप हंगामावरच असते. नुसतं शेतावर भागत नाही. खरिपाची सुगी संपली की दिवाळीनंतर अनेक गावांतील लहान शेतकरी, शेतमजूर कामासाठी स्थलांतर करतात. अनेक जण ऊसतोड कामगार म्हणून कारखान्यावर कामाला जातात. शेतात चांगली आमदानी झाली तर ऊसतोडीसाठी जाणाऱ्या टोळ्यांची संख्या कमी असते. यंदा मात्र या भागातून ऊसतोडीसह अन्य कामांसाठी स्थलांतर करणारांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा परभणी ( video)

पशुधनाचा सांभाळ करणे कठीण खंडाळी येथील शेतकरी लक्ष्मण जंगले म्हणाले, की घरची तीन एकर शेती आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांची बटईने शेती करत असतो. बैलजोडी आहे. औंदा आमच्या भागात एकच पाणी झाला. या तासाचं पाणी त्या तासाल गेलं नाही. सोयाबीन, कापूस वाळून गेली आहेत. दरवर्षी तुरी फुलांनी लवंडून जातात, पण यंदा नुसत्या झाडण्या असल्यामुळं उभ्याच आहेत. खरीप ज्वारीचा कडबा झाला नाही. विकत घ्यायचा म्हणल तर कडब्याचे भाव आताच आभाळाला भिडलेत. शेकड्याला एक हजार रुपये झाले आहेत. सोयाबीनची गुळी झाली नाही. येथून पुढे बैलजोडीला सांभाळणं अवघड दिसत आहे. एखादा महिना सांभाळून बैलजोडी विकून टाकावी लागणार आहे.

कडबा, धान्यांची वानवा घंटाग्रा येथील शेतकरी उद्धवराव पवार म्हणाले, की यंदा लईच जेमतेम पाऊस झाला. चार एकरांत पाच साडेपाच कुंटल सोयाबीन झाले. काढणीचा खर्च १२ हजार रुपये झाला. सोयाबीनची काढणी झाली, की लागलीच रब्बी ज्वारीची पेरणी केली. ज्वारी उगवली पण आता पाण्याअभावी ज्वारीची वाढ खुंटली आहे. खरिपाप्रमाणेच रब्बीतून देखील आमदानीची होईल, असे वाटत नाही.

कापसाची दुसरी वेचणी होणारच नाही दामपुरी येथील ज्ञानोबा नागरगोजे आणि सिंधूबाई नागरगोजे हे दापंत्य मजूर मिळत नसल्यामुळे बोंडे फुटलेल्या कापसाची वेचणी करत होते. दुसरीकडच्या शेतामधील कामात असताना रस्त्यावरच्या शेतातील फुटलेला १० ते २० किलो कापूस चोरट्यांनी वेचून नेला. पुन्हा कापूस चोरी जाऊ नये म्हणून नागरगोजे पतीपत्नी जोडीने कापूस वेचत होते. उन्हात तळल्यामुळे कापसाचे वजन कमी झाल्याने हलका भरत आहे. सर्वच बोंडे एकाच वेळी फुटल्यामुळे दुसरी वेचणी करायला झाडांवर मागं काहीच राहीलं नाही. ज्वारी झाली नाही यंदा सालभर धकवयाचं अवघड आहे, असे सिंधूबाई नागरगोजे यांनी सांगितले.

२१ मंडळांमध्ये ३९ ते ५९ टक्के पाऊस परभणी जिल्ह्यात आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या ६४ टक्के पाऊस झाला आहे. यंदा पावसाची ३६ टक्के तूट झाली आहे. ३९ मंडळांपैकी परभणी, पेडगाव, जांब, दैठणा, पिंगळी, परभणी ग्रामीण, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, बाभळगाव, हदगाव, बोरी, आडगाव, चाराठणा, चाटोरी, बनवस, देऊळगाव गात, वालूर, कुपटा, आवलगाव, कोल्हा या २१ मंडळांमध्ये ३९ ते ५९ टक्के पाऊस झाला आहे.

पाच तालुक्यांतील भूजलपातळी गेली खोल गतवर्षीच्या (२०१७) सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सेलू तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक म्हणजे ८.५१ मीटर खोल. गेल्या पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भूजल पातळी सेलू तालुक्यात १.५ मीटरने, मानवत तालुक्यात ०.४२ मीटरने, सोनपेठ तालुक्यात ०.६६ मीटरने, गंगाखेड तालुक्यात ०.९६ मीटरने कमी झाली आहे.

सहा तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर जून ते सप्टेंबर महिन्यांत अपेक्षित पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे नऊ पैकी परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या आठ तालुक्यांना दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झाला होता. ट्रिगर १ मध्ये पूर्णा तालुका आणि ट्रिगर २ मध्ये गंगाखेड आणि जिंतूर तालुके वगळण्यात आले. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

तीन तालुक्यांना नवीन निकषांचा फटका गंगाखेड तालुक्याला दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झाला होता. परंतु त्यानंतर दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील निकषांमुळे ट्रिगर २ मधून गंगाखेड तालुक्याला वगळण्यात आले. गंभीर दुष्काळामुळे टंचाईची स्थिती असताना दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील नवीन निकषांचा फटका गंगाखेड आणि जिंतूर या डोंगराळ भागांतील तालुक्यांसोबतच पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता गंभीर होणार यंदा गंगाखेड तालुक्यातील मंडळामध्ये जेमतेम ५० टक्केच्या आसपास पाऊस पडला. दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा उडून गेला. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यासोबतच रब्बीच्या आशा मावळल्या आहेत. सद्यःस्थितीत मासोळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. माजलगाव धरणामध्ये देखील केवळ मृत पाणीसाठा आहे. इसाद शिवारातील शेतकऱ्यांना मासोळी धरणाच्या कालव्याचा लाभ मिळतो. साखर कारखाना जवळ असल्यामुळे तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे गतवर्षी इसाद गावाच्या शिवारातमध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु यंदा कमी पावसामुळे ऊस वाळून जात आहे. दुसरीकडे कपाशीची सर्व बोंडे एकदाच फुटून गेल्यामुळे केवळ नख्या असलेली पऱ्हाटी शेतात उभी आहे. पाण्याअभावी तुरीला फुले लागत नसल्यामुळे तुऱ्हाट्या उभ्या असल्याचे चित्र राणीसावरगाव आणि माखणी मंडळातील अनेक गावशिवारांमध्ये दिसत आहे. प्रतिक्रिया लई लांबून पाणी आणावं लागत आहे. गेल्या वर्षी आमच्या तांड्यावरून ऊसतोडीसाठी चार टोळ्या गेल्या होत्या. यंदा १२ टोळ्या गेल्या आहेत. ३० तारखेपर्यंत तांड्यावर कुणी राहणार नाही अशी परिस्थिती आहे. - मारोती चव्हाण, सचिन चव्हाण, निळा नाईक तांडा  (पिंपळदरी), ता. गंगाखेड, जि. परभणी

सिंचनासाठी पाणी कमी पडल्यामुळे आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस होरपळून गेला. त्यात हुमणीच्या प्रादुर्भावामुळे गाळपास आलेल्या उसाचे नुकसान झाले.  - डॅा. निळकंठ भोसले, इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी

तुरी शंभर टक्के गेल्यात. माजलगाव धरणातून पाणीपाळ्या मिळणार नाहीत. त्यामुळे रब्बीतील हरभरा, गहू, उन्हाळी हंगामातील भुईमुगाचे लागवड करता येणार नाही. ऊसही मोडून टाकण्याची वेळ आली आहे. - शेषराव निरस, पडेगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com