बनावट कीटकनाशकप्रकरणी कृषी आयुक्तांचे चौकशीचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः बनावट कीटकनाशक प्रकरणात समाधानकारक कारवाई झाली नसल्याबाबत कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. अमरावती व नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांना या संदर्भात नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

एका कंपनीचे बनावट कीटकनाशक बाजारात आल्याचा सशंय थेट त्या कंपनीनेच व्यक्त केला. त्या कंपनीने राज्यभरातील आपल्या वितरकांकडून माल परत मागवून घेतला. नागपूर येथील एका विक्रेत्याकडे सद्य:स्थितीत त्या कीटकनाशकाच्या विक्रीचा परवाना नाही. परंतु, त्याच्याकडे असलेल्या जुन्या साठ्याची मात्र त्याने कमी दरात अकोल्यातील एका वितरकाला विक्री केली. त्यापोटी जीएसटी बिलही नागपुरातील त्या मुख्य वितरकाने दिले.

अकोल्यातील वितरकाने त्याचे कार्यक्षेत्र असलेल्या अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना हे कीटकनाशक पुरविले. हा साठादेखील कंपनीने परत मागवून घेतला. त्यापूर्वी कृषी विभागाकडे कंपनीने बनावट कीटकनाशके बाजारात दाखल झाल्याने कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून कारवाई सुरू झाली. अकोल्यात कीटकनाशकाचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच मिळाला असून, हे कीटकनाशक यामध्ये पास झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात १६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले. नागपुरातून या कथित बोगस कीटकनाशकाचा पुरवठा झाला असला, तरी त्या ठिकाणी कोणतीच कारवाई कृषी विभागस्तरावरून केली गेली नाही. कृषी आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. आयुक्तांनी अमरावती व नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात कारवाई समाधानकारक नसल्याचे सांगत या प्रकरणी गुणवत्ता निरीक्षक किंवा कोणीही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच कंपनीचा दावा खोटा निघाल्यास कंपनीविरोधात देखील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोल्यात कारवाईसाठी धावाधाव कृषी आयुक्‍तांच्या आदेशानंतर धाबे दणाणलेल्या अकोला कृषी विभागाने अकोल्यातील वितरक महेश बजाज यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला. त्यांच्याकडील कीटकनाशकाच्या विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, पोलिस तक्रारीसाठी पाठपुरावा केला जात आहे. गुणवत्ता निरीक्षक मिलिंद जवंजाळ यांनी त्याला दुजोरा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com