शिस्तीबाबत तडजोड नाही : कृषी आयुक्त सिंह

कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह
कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह

पुणे : राज्याचे नवे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी आयुक्तपदाचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दाखवतानाच कृषी खात्यात शिस्तीबाबत तडजोड करणार नाही. सुनील केंद्रेकर यांच्या कामकाजाला मी पुढे घेऊन जाईन, असे स्पष्ट केले आहे.   राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा बारकाईने आढावा घेण्याचे काम सुनील केंद्रेकर यांच्याकडून सुरू होते. त्यासाठी मंगळवारी दिवसभर एका बैठकीत ते व्यग्र असतानाच सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले. दुसऱ्या बाजूला यवतमाळचे जिल्हाधिकारी श्री. सिंहदेखील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत व्यग्र होते. श्री. सिंह यांना तात्काळ कृषी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले.  नवे कृषी आयुक्त श्री. सिंह यांनी जिल्हाधिकारी म्हणून विदर्भ, मराठवाड्यात कारकीर्द गाजली आहे. भंडारा जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली होताच जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि काही लोक उपोषणालादेखील बसले होते. वाळूमाफिया, आरटीओतील दलाल, जिल्हाधिकारी कार्यालयांमधील एजंट यांना श्री. सिंह यांनी सळो की पळो करून सोडले होते. शेतकरी आत्महत्या हा त्यांच्या अभ्यास आणि कामकाजाचादेखील विषय होता. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे शासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. 

मंगळवारी श्री. केंद्रेकर यांच्या बदलीच्या घडामोडीनंतर राज्यभर खळबळ उडाली. मात्र, नवे कृषी आयुक्त श्री. सिंह हेदेखील श्री. केंद्रेकर यांच्याप्रमाणेच कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीचा आनंद काही तासांचा ठरला. श्री. सिंह हे बेशिस्त आणि गैरव्यवहार खपवून घेत नसल्याची चर्चा पसरली असून त्यामुळे भ्रष्ट लॉबी आता आगीतून उडून फुफाट्यात पडली आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. 

‘अॅग्रोवन’शी बोलताना श्री. सिंह म्हणाले, की कृषी आयुक्तपदाची सूत्रे मी अजून स्वीकारलेली नाहीत. मात्र, श्री.केंद्रेकर यांनी सुरू केलेल्या प्रथा मी तशीच पुढे सुरू ठेवणार आहे. त्यांच्या योजना, संकल्पना तसेच त्यांच्याकडून ज्या विषयांवर कामे सुरू होते ते सर्व पुढे चालू ठेवले जाईल. राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना व धोरण व्यवस्थितपणे राबविले जाईल. 

ग्रामीण व्यवस्था व कृषीविषयक कामकाजाची मला जाणीव आहे. लातूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच भंडारा व परभणीत जिल्हाधिकारी म्हणून मी काम पाहिले आहेत. तेथील सामान्य जनतेला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. आतादेखील मी यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असताना केलेल्या कामांचा तुम्ही कानोसा घेतल्यास माझ्या कामाची पद्धत लक्षात येईल, असे श्री.सिंह म्हणाले.   शासकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करताना त्याची फलश्रृतीदेखील चांगली होण्याकडे माझा कल राहील. कृषी खात्यात काम करताना शिस्तीला प्राधान्य दिले जाईल. श्री.केंद्रेकर हे साडेतीन महिने कृषी आयुक्त होते. त्यांच्या कालावधीतील कामकाज आणि संकल्पनांची माहिती मी त्यांच्याकडून घेणार आहे. मला कृषी आयुक्त म्हणून कामकाज करताना त्यांचा सल्ला उपयुक्त ठरणार आहे, असेही श्री.सिंह यांनी स्पष्ट केले.

बदली माझ्या विनंतीनुसार ः केंद्रेकर दरम्यान, कृषी आयुक्तपदावरून आपली बदली माझ्या विनंतीनुसारच झालेली आहे, असे श्री.सुनील केंद्रेकर यांनी स्पष्ट केले. व्यक्तिगत कारणांमुळे मला बदली हवी होती. तशी विनंती मी शासनाला केली होती. त्यामुळे शासनानाने बदली केलेली आहे, असे श्री.केंद्रेकर यांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com