कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हवेत केंद्रेकर

''पहिल्यांदा कुणी तरी असे पाठबळ देणारा अधिकारी मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये वाढत आहे. ८० टक्के कर्मचारी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या विषयी सकारात्मक आहेत''
कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हवेत केंद्रेकर
कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हवेत केंद्रेकर

अकोला : कृषी विभागात धडाडीचे काम करणारे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यामुळे अडचणीत आलेल्यांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही वरिष्ठ अधिकारी केंद्रेकर यांच्या बदलीसाठी प्रयत्नरत असताना कृषी खात्यातील बहुतांश कनिष्ठ कर्मचारी मात्र श्री. केंद्रेकर आल्यापासून समाधानी आहेत. कृषी खात्याचा बिघडलेला गाढा ताळ्यावर आणण्यासाठी कृषी आयुक्तपदाचा अधिकारी काम करत असल्याने नक्कीच बदल घडतील. वर्षानुवर्षे आपल्या रखडलेल्या मागण्या सुटतील, अशी अपेक्षा त्यांच्यामध्ये वाढीस लागली आहे. ‘कृषी आयुक्त केंद्रेकर यांच्या बदलीची अफवा’ ही बातमी २६ ऑगस्टच्या ‘ॲग्रोवन''मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी खात्यात पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटले. हे वृत्त वाचून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. कर्मचारी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर ‘ॲग्रोवन''शी दूरध्वनीवरून संपर्क साधत श्री. केंद्रेकर यांची बदली व्हायला नको, अशी थेट मागणी केली. श्री. केंद्रेकर हे काम करणाऱ्यांच्या पाठीशी असल्याने काहींना त्यांची ही कार्यशैली अडचणीची वाटू लागली आहे.  श्री. केंद्रेकर थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करतात. कृषी खात्यात वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या काही पद्धती त्यांनी बंद करण्याचा सपाटा लावला. गेल्याच आठवड्यात कृषी खात्याची असंख्य खाती बंद करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्यामुळेच घेतला गेला. अशा विविध निर्णयांचा वर्षानुवर्षे ‘गब्बर’ बनलेल्यांना आता फटका बसू लागला. यामुळे ही लॉबी श्री. केंद्रेकर यांच्या बदलीसाठी सक्रिय झाली असल्याचे सांगितले जाते. काही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा हा गट यामागे असल्याची चर्चा आहे.  एका कृषी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘श्री. केंद्रेकर यांच्या कार्यशैलीला वरिष्ठ अधिकारी कंटाळले आहे. कृषी आयुक्त थेट फिल्डवर व दुर्गम ठिकाणी जातात. थेट शेतकऱ्यांशी बोलतात. अशावेळी जे कधी बांधावरच गेलेले नसतात ते अधिकारी कृषी आयुक्त व शेतकऱ्यांसमोर उघडे पडत आहेत. शिवाय त्यांनी आता विविध खाती बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन दिवसांत ही कारवाई झाली. त्यांच्यामुळे कृषी विभागाला चांगले वळण लागण्याची शक्‍यता आहे. कृषी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना तर त्यांनी ‘‘तुम्ही कामे करा, मी पाठीशी आहे. तुमची काहीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा. अपाॅइंटमेंट घेतली नसेल तरी भेटायला या. तुमचा पालक म्हणून मी पाठीशी उभा राहीन. परंतु शेतकऱ्यांची कामे वेळेत व चांगली झाली पाहिजेत,’’ असे सांगितले. त्यांची ही भूमिका संघटनांना मान्य आहे. पहिल्यांदा कुणी तरी असे पाठबळ देणारा अधिकारी मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये वाढत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामच करण्याची सवय नाही, अशा १५ ते २० टक्के कर्मचाऱ्यांसाठीही ते अडचणीचे ठरू शकतात. मात्र ८० टक्के कर्मचारी सकारात्मक आहेत, असेही दुसऱ्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. एकूण केंद्रेकर हे काही अधिकाऱ्यांना नकोसे झालेले असले, तरी कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्यामुळेच आशेचा किरण मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com