नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त

नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त
नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त

पुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या हालचालींना वाचा फोडल्याबद्दल अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘ॲग्रोवन’च्या भूमिकेचे स्वागत केले. नागरी सेवा मंडळाचा ‘क्लोन’ काढून टाकल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही, असे मत या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना ‘मागेल तेथे बदली’ मिळण्याची पद्धत चांगल्या अधिकाऱ्यांची गळचेपी करणारी असून नागरी सेवा मंडळाला भक्कम केल्याशिवाय बदल्यांमध्ये कधीही पारदर्शकता येणार नाही. मात्र, पारदर्शकता आणण्याची राज्य सरकारची इच्छा आहे का, असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.  नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष तत्कालीन प्रधान कृषी सचिव बिजयकुमार, तत्कालीन दुग्धविकास सचिव विकास देशमुख आणि कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बदल्यांचे निर्णय घेतल्यानंतरही अंतिम आदेशात राजकीय फेरफार केल्याचे उघड झाले आहे. बदल्यांबाबत असे वारंवार होत असल्यामुळे अधिकारी नाराज आहेत.  “मंडळाला खिळखिळे करण्यात कृषी विभागातील सोनेरी टोळीचाच हात आहे. त्यामुळेच मंडळाच्या बाहेर एक छुपे मंडळ तयार झाले आहे. या ‘क्लोन मंडळा’कडून परस्पर बदल्यांची नावे व पदे ठरतात. मंत्रालयातील एक खासगी सचिव, त्यांच्या जोडीला एक उपसचिव आणि कृषी खात्यातील एक सहसंचालक पद्धतशीरपणे बदल्यांच्या कागदपत्रांची फिरवाफिरव करतात,” अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.  नागरी सेवा मंडळाच्या या ‘क्लोन’ला राजकीय आशीर्वाद मिळतो. एक संचालकदेखील या मंडळाचा सल्लागार आहे. थेट राजकीय वैर नको म्हणून त्या-त्या वेळच्या आयुक्तांनीदेखील नाईलाजास्तव मंडळाच्या मूळ बैठकीत ‘क्लोन’कडून आलेली काही नावे बेमालूमपणे मान्य केली आहेत. ‘नागरी सेवा मंडळाचे अधिकृत सदस्य म्हणून कृषी सचिव किंवा आयुक्तांनी कठोर भूमिका घेतल्यास राजकीय समस्या उभी राहू शकते. त्यामुळे मंडळ फक्त शिफारशी करून मोकळे होते,’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

आस्थापना विभागाच्या म्हणण्यानुसार, “नागरी सेवा मंडळाने बदल्यांबाबत काहीही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय हा सक्षम अधिकार्याचा असतो. सध्या सक्षम अधिकारी थेट मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री आहेत. नागरी सेवा मंडळाने चुकीची बदली केल्यास अन्याय झालेला अधिकारी एकवेळ मंडळाला जाब विचारू शकतो. मात्र, थेट मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी सक्षम अधिकारी म्हणून चुकीचा निर्णय घेतल्यास निर्णयाला आव्हान देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. राजकीय रोष घेण्यापेक्षा अडगळीतील पोस्ट बरी अशी भूमिका चांगले अधिकारी घेतात.” 

कृषी विभागातील बदल्यांमध्ये क्लोनच्या माध्यमातून झालेल्या बदल्यांना ‘टेंडर बदली’ असेही म्हटले जाते. ठेकेदार जसे टेंडर भरून कंत्राट मिळवतात. त्याच धर्तीवर वशिला वापरून किंवा ‘क्लोन मंडळा’ला ‘विश्वासा’त घेऊन केलेली बदली म्हणजे ‘टेंडर बदली’ समजली जाते. 

“कृषी विभागात टेंडर भरून पोस्ट मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना कृषीविस्तार किंवा शेतकरी विकास याच्याशी काहीही देणेघेणे नसते. बदलीसाठी गमावलेला ‘विश्वास’ पुन्हा ‘वसूल’ करणे इतकेच टार्गेट या अधिकाऱ्याचे असते. त्यामुळे असे अधिकारी वेळप्रसंगी आयुक्तांनादेखील जुमानत नाहीत,’’ असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.   क्लोन, टेंडरसंस्कृती हटविण्यासाठी मंडळ बळकट हवे टेंडर बदलीने पदे मिळणारे अधिकारी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विकास देशमुख, सुनील केंद्रेकर; तसेच आताचे विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांचेही आदेश झुगारत असल्याचे दिसून आले आहे. नागरी सेवा मंडळाचा कायदेशीर नियमावलींचे भक्कम कवच देणे, मंडळाच्या कामात पारदर्शकता आणणे आणि मंडळाचे निर्णय अंतिम ठेवणे हेच उपाय बदल्यांमधील ‘क्लोन’ किंवा ‘टेंडर’संस्कृती नष्ट करू शकतात. ‘वेळीच उपाय न केल्यास कृषी खाते संपेलच; पण ‘टेंडर’ संस्कृती कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया एका माजी कृषी संचालकाने व्यक्त केली. (समाप्त)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com