गडचिरोली जिल्ह्यात शेती क्षेत्रात झालेले बदल
गडचिरोली जिल्ह्यात शेती क्षेत्रात झालेले बदल

गडचिरोलीत उगवली कृषी विकासाची पहाट

विकासाच्या कोसो दूर असलेल्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात कृषी विकासाचे वारे वाहू लागले. यंत्राने भातरोप लागवड, भातशेतीत मत्स्यपालन, शेडनेटमध्ये भाजीपाला लागवडीकडे शेतकरी वळताहेत. भाताचा ‘सेंद्रिय ब्रॅंड’ मार्केटमध्ये आला आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याने कृषी विकासाची वाट पकडली आहे.  गडचिरोली जिल्ह्यात भात(धान)शेती मोठ्या प्रमाणात आहे. या शेतीला आता यांत्रिकीकरणाची जोड मिळाली आहे. जिल्हा परिषदेचा निधी तसेच मानव विकास योजनेतून २०१२-२०१३ मध्ये यांत्रिकीकरणाची रुजवात या जिल्ह्यात पहिल्यांदा झाली. शेतकरी गटांना ९० टक्‍के अनुदानावर यंत्राचा पुरवठा झाला. मुलचेरा तालुक्‍यात भातरोप लागवड यंत्र प्रकल्पाची सुरवात तत्कालीन जिल्हाधिकारी रंजीतकुमार यांच्या उपस्थितीत झाली. येथूनच परिवर्तनाला गती मिळाली. कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. चिखलणीसाठी पॉवर टिलर वापरास प्रोत्साहन मिळाले. भात कापणी, मळणीसाठी यंत्राचा वापर वाढतोय.  शेतकरी भाजीपाला, इतर नगदी पिकांकडे वळला आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याचा वापर शेतकरी करू लागले आहेत. या वर्षी अहेरी तालुक्‍यात मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्‍त शिवार अभियानातून सुमारे ७५० शेततळी घेण्यात आली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पीक उत्पादनात शाश्वती आली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांत भाताखाली सात लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. गडचिरोलीतील शेतकरी पीकफेरपालटाकडे वळलेत. अहेरी व सिरोंचा तालुक्‍यांत २०१६-१७ या वर्षात कापूस लागवड पाच हजार हेक्‍टर होती, ती आता सात हजार हेक्‍टवर पोचली आहे. 

शेतकरी गटांसाठी सिंचन योजना  दहा शेतकऱ्यांचा गट तयार करून पाइप, तुषार संच आणि वीजपंपाचा पुरवठा मानव विकास मधून केला जातो. यासाठी ९० टक्‍के अनुदान आहे. उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकरी गटाला पाइपलाइन करिता खोदकाम, इतर श्रमिक कामे करावी लागतात.  पाइपलाइनद्वारे सिंचनाची योजना गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा राबविण्यात यश आले. एक किलोमीटर पाइपलाइनद्वारे नदी किंवा मालगुजारी तलावाचे पाणी शेतात पोचविले जाते. गटातील शेतकऱ्यांच्या शेतात अंडरग्राउंड व्हॉल्व्ह बसविले आहेत. व्हॉल्व्ह सुरू केला की पाटाने शेतकरी पाणी देऊ शकतो. पाण्याच्या योग्य वापराकरिता तुषार संच देण्यात आले. अहेरी तालुक्‍यात एकाच आठवड्यात तब्बल १४५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ठिबक, तुषार अनुदानासाठी कृषी विभागाकडे आले आहेत.

शेतकऱ्यांना मिळाली वीजजोडणी  महावितरण, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले.  शासकीय यंत्रणांच्या या प्रयत्नांना यश येत तब्बल साडेसहा हजारांवर शेतकऱ्यांनी वीजजोडण्यांकरिता अर्ज केले. या सर्व अर्जकर्त्या शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीत वीजजोडणी देण्यात आली. त्यामुळे अहेरी तालुक्‍यात भाजीपाला लागवड ३२५ ते ३५० हेक्‍टरवर पोचले. सिंरोचा तालुक्‍यात मका, कापूस, मिरचीखालील क्षेत्र वाढले आहे. शेतमालाचा ‘सेंद्रिय ब्रॅंड`  १) गडचिरोली ऑरगॅनिक फार्मिंग सिस्टिम (जीओएफएस) या ब्रॅंडने जिल्ह्यातील उत्पादित भाताला राज्य, देश आणि जागततिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. जिल्हाधिकारी एस. आर. नायक, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रयत्न केले. शेतकरी गटाचा प्रमुख धान्य महोत्सव आणि कृषी प्रदर्शनात ब्रॅंडने भाताची विक्री करतो. २) महाराष्ट्र स्पर्धाक्षम शेती प्रकल्पांतर्गत एटापल्ली येथे एक तर चामोर्शी तालुक्‍यात दोन शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. या तीन कंपन्यांना राइस मिल देण्यात आली. आता राइस मिलमध्ये प्रक्रियेचे काम होणार आहे. ३) नागपूर, अकोला येथील कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात पहिल्यांदा गडचिरोलीतील तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आला. नागपूरमध्ये ५२ क्‍विंटल, तर अकोला येथे साडेपाच क्‍विंटल सेंद्रिय तांदळाची विक्री. चिन्नोर आणि डीआरके-२ हा बारीक तांदूळ ८० रुपये किलो, जयश्रीराम हा तांदूळ ६० रुपये किलो, तर इतर जातीचा तांदूळ ५० रुपये किलोप्रमाणे विक्री. ४) ज्या शेतकऱ्याचा माल असेल त्या भातपिशवीच्या लेबलवर शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक असतो. त्यासोबतच गटाच्या पीजीएस प्रमाणपत्राची नोंद असते. शेतमाल विक्रीनंतर त्याच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. ५) जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांची शिखर कंपनीची नोंदणी केली जाणार आहे. आत्माअंतर्गत २५ शेतकरी गट आहेत. त्या माध्यमातून २२०० एकरावर सेंद्रिय भात लागवड केली जाते.

असे आहेत बदल  १) अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर ः अहेरी, मुलचेरा, भामरागड, धानोरा आणि एटापल्ली या तालुक्‍यांतील २०८ दुर्गम गावांमध्ये वीज पोचविणे शक्‍य नसल्याने संरक्षित सिंचन सोयी निर्माण करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर. २) गडचिरोलीत पहिली जैवविविधता ः गाव परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मीळ वनौषधीचे नियमन आणि परवाने देणे याकरिता जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गठण. राज्यातील पहिली जैवविविधता समिती स्थापन करण्याचा मान गडचिरोलीने मिळविला. त्या वेळी सुमारे तीनशेपेक्षा अधिक जैवविविधता समित्यांचे गठण झाले. ३) जिल्ह्यात पहिले पाच शेडनेट ः ताटीगुडम गावात तीन, चंद्रा व कोरोली या गावांमध्ये एक याप्रमाणे पाच शेडनेटची उभारणी.  तीन शेडनेटमध्ये मिरची लागवडीवर भर. ४) कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण केंद्र ः व्हीएसटी कंपनी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, आत्मा आणि केव्हीके अशा सार्वजनिक खासगी भागीदारीतून राज्यातील पहिले कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण केंद्राची सुरवात. ५) गोदाम सुविधा ः  ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे आणि शेतकऱ्यांचा शेतमाल साठवणुकीकरिता व्यवस्था निर्माण होण्याच्या उद्देशाने गावपातळीवर गोदामांची उभारणी. कृषी गोदाम व्यवस्थापन समितीची स्थापना. प्रतिगोणी तीन रुपये असे शेतकऱ्यासाठी साठवणूक शुल्क. आदिवासी विकास सोसायटीच्या माध्यमातून भाताची खरेदी आणि साठवणूक.  - डॉ. प्रकाश पवार, ९९८७७२१९६१, (प्रकल्प संचालक, आत्मा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com