होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र...

शेती शिक्षणाची लागली गोडी आमच्या शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरला आहे. विद्यार्थी शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात. पालकांच्याबरोबरीने चर्चा करून शेतीमध्येही वापर करतात. - बी. डी. गायकवाड (मुख्याध्यापक, कृषी औद्योगिक विद्यालय, चांबळी, जि. पुणे) - एस. सी. बडदे, (मुख्याध्यापक, कृषी औद्योगिक विद्यालय, कोडीत, जि. पुणे)
चांबळी, जि. पुणे ः  प्रोजेक्टरच्या माध्यमातून कृषी विषय शिकवताना सुजाता पवार.
चांबळी, जि. पुणे ः प्रोजेक्टरच्या माध्यमातून कृषी विषय शिकवताना सुजाता पवार.

‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून जमीन सुपीकता, सूक्ष्म सिंचनाची माहिती मिळाली. माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि उपाययोजना, कृषिपूरक योजना कळाल्या. याची घरच्यांच्याबरोबरीने चर्चा करते. त्यानुसार शेती नियोजनात बदल होताहेत. पुढील काळात मी शेती विषयामध्येच संशोधन करायचे निश्‍चित केले आहे, हे बोल आहेत चांबळी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील अनुजा कामठे या विद्यार्थिनीचे...

अशाच प्रतिक्रिया चांबळी आणि कोडीत गावांतील कृषी औद्योगिक विद्यालयातील कुणाल कामठे, साक्षी शेंडकर, तेजश्री बडदे, काजल जरांडे, निकिता कामठे यांच्या. याला कारण म्हणजे शाळेत सुरू असलेला बोरावके कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम. सध्या शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयक अभ्यासक्रम असावा की नसावा याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू असताना पुण्यातील रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके कृषी उद्योजकता केंद्राचे संस्थापक उदय नारायणराव बोरावके यांनी काळाची गरज ओळखून पुणे जिल्ह्यातील चांबळी आणि कोडीत या गावांतील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कृषी औद्योगिक विद्यालयामध्ये कृषीविषयक अभ्यासक्रमाची सुरवात केली. याला विद्यार्थी तसेच पालकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. 

कृषी शिक्षणाचा डिजिटल वर्ग.. पहा Video... उपक्रमाबाबत उदय बोरावके म्हणाले, की बदलती शेती आणि व्यापार पहाता ग्रामीण भागातील शाळांमध्ये नेहमीच्या विषयांच्याबरोबरीने शेती आणि पूरक व्यवसायाबद्दल शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके कृषी उद्योजकता केंद्रामार्फत पुणे जिल्ह्यातील चांबळी आणि कोडीत या गावांतील शाळांमध्ये या वर्षीपासून इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बोरावके कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमाला सुरवात केली. माझे वडील स्वर्गीय रावबहादूर नारायणराव बोरावके यांचे १२५ वे जयंती वर्ष आणि स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील चांबळी (ता. पुरंदर) येथील कृषी औद्योगिक विद्यालयामध्ये जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत हा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरवात केली. हा प्रकल्प सुरू करण्याअगोदर गावातील शेती, पाणी उपलब्धता, पीक पद्धतीचा अभ्यास केला. विद्यार्थांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, शेती क्षेत्र, पीक पद्धती, पाणी उपलब्धता, जनावरांची संख्या, पूरक उद्योगाबाबत माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना शेती तंत्र शिकवताना कोणत्या विषयांवर भर देणे गरजेचे  आहे हे लक्षात आले.  या भागात प्रामुख्याने वाटाणा, घेवडा, गाजर, टोमॅटो, पावटा, झेंडू, गुलाब, शेवंती, सीताफळ, डाळिंब, चिकूची प्रामुख्याने लागवड आहे. या  पीकपद्धतीनुसार कृषी तज्ज्ञांकडून सोप्या भाषेत विषयांची मांडणी केली. ही माहिती योग्य छायाचित्रे, आकृतीच्या माध्यमातून प्रोजेक्टरवर दाखविण्याची सोय केली. या प्रकल्पाचे उद्‌घाटन ५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळ मीडिया प्रा. लि.चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि टाटा सन्स चे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकार यांच्या हस्ते झाले.   

कृषी अभ्यासक्रमाची झाली सुरवात  चांबळी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील कृषी औद्योगिक विद्यालयामध्ये दोन जानेवारी रोजी कृषी अभ्यासक्रमास सुरवात झाली. याबाबत उदय बोरावके म्हणाले, की शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात कोणताही बदल न करता शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी हा अभ्यासक्रम शिकविला जातो. अभ्यासक्रम शिकविण्यासाठी कृषक ग्रामगुरू म्हणून गावातील सुजाता पवार यांच्याकडे जबाबदारी आहे. स्वतः शेती करत असल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम शिकवणे सोपे जाते. त्यांनी संगणक प्रशिक्षणही घेतले आहे.

विद्यालयाच्या हॉलमध्ये बारा संगणक उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून देण्यासाठी आम्ही प्रोजेक्टर, स्कीनची व्यवस्था केली. वीज टंचाई लक्षात घेऊन सोलर पॅनेल बसविले. जमिनीचे प्रकार, पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता, अन्नद्रव्यांचे शोषण यांसारखे विषय आकृती आणि छायाचित्रांच्या माध्यमातून शिकविले जातात. गाव  परिसरातील पीकपद्धतीनुसार विषय शिकविले जात असल्याने हे विद्यार्थी पालकांना सुधारित तंत्र, अभ्यासक्रमातील विषयाची माहिती देतात. काही पालकांनी याचा वापर पीक व्यवस्थापनामध्ये करण्यास सुरवात केली आहे. त्यांचा   चांगला परिणाम दिसतो आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीविषयक माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविले जातात. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम संपल्यानंतर विषय पुस्तिका दिली जाणार आहे. प्रत्येक इयत्तेनुसार विषयांची वर्गवारी पुस्तिकेमध्ये करण्यात आली आहे. वर्षातून दोनवेळा पालकांना शाळेत बोलावून उपक्रम तसेच शेतीविषयक संशोधनाची माहिती दिली जाते. काही पालकांनी मुलामुलींना शेतीतील एक गुंठा जमीन पीक लागवड, व्यवस्थापनासाठी दिली आहे. शाळेत शिकविलेल्या तंत्रज्ञानाचा वापर पीक व्यवस्थापनात करत असल्याने विद्यार्थ्यांचा नवीन शेती तंत्रज्ञान शिकण्याचा हुरूप वाढला आहे. 

चांबळीमधील उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी कोडीत येथील कृषी औद्योगिक विद्यालयानेही पुढाकार घेत जुलैपासून आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यासक्रमाची सुरवात केली. हा अभ्यासक्रम सोमवार आणि मंगळवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत शिकविला जातो. याठिकाणी बोरावके कृषी उद्योजकता केंद्राचे शिक्षण प्रकल्प समन्वयक रेवणनाथ भडांगे हे कृषक ग्रामगुरू म्हणून विद्यार्थ्यांना शिकवितात. सध्या चांबळी येथील शाळेत ८६  तर कोडीत येथील शाळेत ७७ कृषिपुत्र आणि कृषिकन्या शेती विषय शिकत आहेत.

डिजिटल सायब्ररीला सुरवात  शाळांच्यामध्ये संगणक प्रशिक्षणाची सोय झाली असल्याने या सुविधांचा फायदा विद्यार्थांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान माहिती करून देण्यासाठी बोरावके कृषी ज्ञानगंगा डिजिटल सायब्ररीची सुरवात होत आहे. याबाबत बोरावके म्हणाले, की चांबळी येथील शाळेत संगणकांची सोय आहे.  विद्यार्थ्यांना शेतीविषयक व्यापक ज्ञान व माहिती उपलब्ध होण्यासाठी संगणक वापर, त्यावर विविध पिकांची माहिती, संदर्भ कसे मिळवायचे याचे प्रशिक्षण देणार आहोत.

असे आहेत विषय... 

  • जमीन, पाणी, खते.
  • पीकपद्धती, फळपिके, 
  • भाजीपाला लागवड तंत्रज्ञान.
  • फळबाग, रोपवाटिका, कृषी अभियांत्रिकी.
  • पीक मशागत, काढणी यंत्रणा, प्रक्रिया तंत्रज्ञान.
  • वीज जोडणी, मोटार जोडणी.
  • ग्रामीण लोहशाही, शेतीविषयक कायदे.
  • शेती संशोधन संस्था.
  • पर्यावरण, सामाजिक वनीकरण.
  • बॅंकेचे व्यवहार, विमा, शासकीय योजना.
  • जमा-खर्च हिशेबाची ओळख.
  • भाषाज्ञान, मराठी, इंग्रजी भाषेतील संवाद आणि पत्रव्यवहार.
  • सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस.
  •  मानवी आणि पशू आरोग्य.
  • -   महेश थोरात,७७४४०५४८४९  :  rbcap125@gmail.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com