तेलंगणात शेतकऱ्यांना एकरी ८००० चे गुंतवणूक सहकार्य

तेलंगणात शेतकऱ्यांना एकरी ८००० चे गुंतवणूक सहकार्य
तेलंगणात शेतकऱ्यांना एकरी ८००० चे गुंतवणूक सहकार्य

हैदराबाद : तेलंगण राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिकाधिक प्राधान्य दिले आहे. सिंचन आणि विकासाला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक सहकार्य योजनेंतर्गत प्रति एकरी ८००० रुपये आणि ५ लाख रुपयांचे विमा कवच देऊन मोठा दिलासा दिला अाहे. सिंचन क्षेत्र विकासासाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद यंदा करण्यात आली आहे.  राज्याचे वित्तमंत्री इ. राजेंद्र यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. १५) अर्थसंकल्प २०१८-१९ सादर केला. सुमारे १ लाख ७४ हजार ४५४ कोटी रुपयांचे एकूण निर्धारित खर्च असलेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्च १ लाख २५ हजार ४५४ कोटी रुपये, तर भांडवली खर्च ३३ हजार ३६९ कोटी रुपये असल्याचे वित्तमंत्र्यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले.  अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिताही कल्याणकारी योजनांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करण्यात अाला अाहे. सामाजिक संरक्षण निवृत्तिवेतन योजनेसाठी ५३०० कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली अाहे. यात वयोवृद्ध, विधवा, ताडी कामकार, हातमाग कामगार यांचा समावेश आहे. सुमारे ४१ लाख ७८ हजार २९१ लोकांचा याचा लाभ होणार आहे. लग्नाकरिता महिलांना आर्थिक सहयोग म्हणून कल्याण लक्ष्मी, शादी मुबारक अशा योजना आहेत. यासाठी १४५० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती-जमाती आणि भटके विमुक्त जातींसाठी विशेष विकास निधीची स्थापना करण्यात आली असून, याकरिता अनुक्रमे १६ हजार ४५३ कोटी आणि ९ हजार ६९३ कोटी रुपये यंदा निर्धारित करण्यात अाले आहेत.  वैद्यकीय अाणि आरोग्य क्षेत्रासाठी ७३७५ कोटी रुपये तरतूद आहे. सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीने निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी दोन बेडरुमचे घर योजनेसाठी २६४३ कोटी प्रस्तावित केले आहे. पंचायत राज आणि ग्रामीण विकासासाठी १५ हजार ५६४ कोटी, रस्ते आणि इमारत बांधणीसाठी ५ हजार ५७५ कोटी, शालेय शिक्षण १० हजार ८३० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.     शेतीसाठी अर्थसंकल्पातील तरतुदी...

  • शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक सहकार्य योजनेंतर्गत १२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. २०१८-१९ पासून या योजनेंतर्गत दोन पिकांसाठी प्रत्येकी ४ हजार रुपये शेतकऱ्यांना गुंतवणूक सहकार्य केले जाणार आहे. 
  •  शेतकरी गट विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचा जीवन विमा सुरू करण्यात आला आहे. याकरिता ५०० कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. 
  •  कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत अर्थसंकल्पात स्वतंत्र ५२२ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. 
  •  सूक्ष्म सिंचनासाठी १२७ कोटी रुपये यंदा राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. 
  •  पॉलिहाऊस आणि हरितगृहातील शेतीसाठी १२० कोटींची स्वतंत्र तरतूद करून संरक्षित आणि आधुनिक शेतीस प्रोत्साहन दिले अाहे.  
  •  शेती अाणि कृषी पणन क्षेत्रातील सुधारणांसाठी १५ हजार ७८८ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात अाले अाहेत.  
  • सिंचन क्षेत्रालाही अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले अाहे. २५ हजार कोटी रुपये अशी भरीव तरतूद तेलंगण सरकारने केली आहे. 
  • ​राष्ट्रीय विकासदराच्या ६.६ टक्क्यांच्या तुलनेत तेलंगण राज्याचा आर्थिक विकासदर हा १०.४ टक्के अपेक्षित असून, विकासवाढीत निर्मिती आणि कृषी क्षेत्राचे आव्हान आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा २०१७-१८चा विकासदर ६.९ टक्क्यांपर्यंत पोचण्याची शक्यता अाहे. - इ. राजेंद्र, अर्थमंत्री, तेलंगण राज्य

    ​  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com