पुणे बाजारसमितीत असुविधा
पुणे बाजारसमितीत असुविधा

पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात

पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या समित्यांमध्ये क्रमांक दाेनवर असलेली पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात अडकली असून, पायाभूत सुविधांचा बाेजवारा उडाल्याचे चित्र बाजार समितीमध्ये आहे.
 
बाजार समितीच्या पायाभूत सुविधांवरील वाढत्या ताणामुळे सेवा देण्यास बाजार समितीची त्रेधा उडत असून, प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे पडत असल्याची तक्रार बाजार घटकांकडून हाेत आहे. बाजार समितीने तातडीने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी बाजार घटकांकडून व्यक्त हाेत आहे. 
 
पुणे बाजार समितीचा विस्तार सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर असून, फळे, भाजीपाला, कांदा,बटाटा, फूल, पान आदी विविध विभागांमध्ये बाजार आवार विस्तारले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या ४० वर्षांपूर्वी शहराबाहेर असलेला बाजार आवार आता शहरात आला आहे. तसेच दिवसेंदिवस बाजार समितीमध्ये देशाच्या विविध राज्यांमधून होणारी शेतीमालाची आवक आणि देशांतर्गत हाेणारी खरेदी-विक्री वाढली आहे. यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. 
 
याबाबत अडते असाेसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अडते विलास भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमध्ये रस्ते, वीज, पाणी, वाहतूक आणि कचऱ्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. प्रामुख्याने वाहतूक आणि कचऱ्याच्या समस्येचा व्यापारावर परिणाम झाला आहे. बाजार समितीमध्ये दरराेज लहान माेठी अशी सुमारे एक हजार वाहने येत असतात. वाहनचालक, अडते आणि कामगार वाहतुकीची शिस्त पाळत नसल्याने वाहतूक काेंडी हाेते. एकेरी वाहतुकीलादेखील काेणी जुमानत नसल्याचे समस्येत अधिक भर पडते.
 
वाहतूक काेंडीमुळे शेतीमाल गाळ्यावर येणे, खाली उतरविणे, लिलाव करणे, खरेदीदारांनी खरेदी करणे आणि व्यापाऱ्यांना विक्रीसाठी शहरात इच्छितस्थळी पाठविणे आदींसाठी वेळ जाताे. परिणामी व्यापारावर विपरित परिणाम हाेत अाहे. तसेच पाणीपुरवठा कमी दाबाने हाेत असून, कचरा उचलण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने कचऱ्यांचे ढीग जागोजागी साचलेले असतात. ड्रेनेजची पाइपलाइन ठिकठिकाणी नादुरुस्त असून, यातील पाणी बाजार आवारात पसरल्याने दुर्गंधी पसरून आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांबाबत बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र ठाेस उपाययाेजना हाेत नाहीत.
 
फळ विभागातील ज्येष्ठ अडते युवराज काची म्हणाले, की मुख्य प्रवेशद्वार क्रमांक एकवरील शेतमालाचा व्यापार ही वाहतुकीची मुख्य समस्या असून, बाजार समिती प्रशासनाला वारंवार विनंती करून निवेदने देऊनसुद्धा प्रवेशद्वारावरील डमी अडत्यांवर कारवाई हाेत नाही. यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण हाेत आहेत. काही विशिष्ट अडते बाजार व्यवस्थेला वेठीस धरत असल्यानेच ही समस्या कायम आहे. या ठिकाणावरील समस्या दूर केल्यास व्यापार अधिक सुरळीत हाेण्यास मदत हाेईल. तसेच दुपारी १२ वाजल्यानंतर बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी हाेत नाही. विविध समस्यांनी बाजार व्यवस्थेला ग्रासले असून, भविष्यात व्यापार करणे अवघड हाेणार आहे.
 
फुलबाजार अडते असाेसिएशनचे अध्यक्ष अप्पा गायकवाड म्हणाले, की फुलबाजाराची क्षमता आता पूर्णपणे संपली असतानादेखील अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांना बाजारात रस्त्यावर बसविले जात आहे. यामुळे माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत अाहे. हीच मुख्य समस्या सध्या फुलबाजारात आहे. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे पहाटे वाहने वेळवर गाळ्यावर येत नाही. यामुळे वेळवर फुलांची विक्री हाेत नसल्याने फुलांचा दर्जा खालावताे व शेतकऱ्यांना याेग्य दर मिळत नाही. तसेच कचऱ्यांची समस्या गंभीर बनली आहे.
 
काेट्यवधी रुपये खर्चून नवीन फुलबाजार बांधण्यात येत आहे. दीड वर्षात गाळे हस्तांतर करू असे सांगण्यात आले हाेते. मात्र दीड वर्षानंतर केवळ एकच स्लॅब झाला आहे. यामुळे आणखी दाेन वर्षे तरी इमारत पूर्ण हाेणार नाही. यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित हाेत आहे. 
 
दरम्यान, बाजार समितीमधील छत्रपती शिवाजी कामगार युनियननेदेखील बाजार आवारातील अस्वच्छता आणि असुविधांबाबत आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे. बाजार समिती प्रशासनाने कचऱ्यासंदर्भात तातडीने कायमस्वरूपी उपाययाेजना न केल्यास सभापतींच्या कार्यालयात कचरा टाकून आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे सचिव संताेष नांगरे यांनी दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com