शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी मंत्रालयाचा ताबा

शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी मंत्रालयाचा ताबा
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी मंत्रालयाचा ताबा

पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या शास्त्रज्ञांची फौज पुरविणाऱ्या राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळावरील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (आयसीएआर) नियंत्रण तडकाफडकी हटविण्यात आले आहे. या मंडळाचा ताबा आता थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.  मंडळावर यापूर्वी फक्त माजी कुलगुरू दर्जाचा ज्येष्ठ शास्त्रज्ञ अध्यक्ष म्हणून कामकाज पहात असे. आता माजी आयएएस अधिकारीदेखील अध्यक्ष करता येईल, असा नवा नियम लागू केला गेला आहे. महाराष्ट्राच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचा ताबा घेण्यासाठी परिषदेच्या उपाध्यक्षांनी जसा कायदा वाकवला होता, तोच प्रकार आता देशपातळीवर घडल्याचे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे.  देशातील सर्व कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रांसाठी दर्जेदार शास्त्रज्ञांची निवड करण्याची जबाबदारी राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळावर (एएसआरबी) आहे. मंडळाच्या अस्तित्वापासून यात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नव्हता. भरती मंडळाकडून कृषी शास्त्रज्ञांची निवड गुणवत्तेवर केली जात होती. अर्थात, भरती मंडळाचे नियंत्रण ‘आयसीएआर’ अर्थात भारतीय कृषी शिक्षण परिषदेकडे असल्यामुळे पक्षपात, गैरव्यवहार, राजकीय कामकाजाचा आरोप मंडळावर कधीही झालेला नव्हता.  ‘‘कृषीभरती मंडळाचे कामकाज बऱ्यापैकी स्वायत्त होते. मंडळाचे नियंत्रण आयसीएआरकडे असल्याने कुणाला बोट दाखविण्यासाठी जागा मिळत नव्हती. ‘आयसीएआर’मुळेच देशातील कोणत्याही राजकीय घटकांना शास्त्रज्ञ भरतीत कधीही थेट हस्तक्षेप करता आला नाही. मात्र, केंद्रीय कृषी मंत्रालयाला हा हस्तक्षेप हवा होता,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘‘कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे काम ‘आयसीएआर’ नव्हे, तर आपल्याच अखत्यारित चालावे तसेच मंडळाचा प्रमुखदेखील बिगर शास्त्रज्ञाला करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्रालयात चालू होत्या. त्याला यश आले आहे,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या कृषी भवनाने आता केंद्रीय शास्त्रज्ञ भरती मंडळाची धोरणात्मक वाट पूर्णतः बदवून टाकली आहे. केंद्रीय कृषी अवर सचिव राजेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात काढलेल्या एका आदेशानुसार (क्रमांक १-१-२०१८-आस्थापना) ‘‘भरती मंडळ आता ‘आयसीएआर’च्या नव्हे; तर केंद्रीय कृषी शिक्षण व संशोधन खात्याच्या अखत्यारित काम करेल,’’ असा आदेश जारी केला आहे.  ‘‘आयसीएआर’पासून कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ वेगळे करण्यात आलेले आहे. यापुढे कृषी शिक्षण व संशोधन खात्याच्या आस्थापना विभागाकडूनच मंडळाचे व्यवहार पाहिले जातील,’’ असे कृषिभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे.  भरतीचा दर्जा घसरेल देशातील ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञांना या बदलामुळे धक्का बसला आहे. मंडळाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयएएस अधिकारी कशाला हवा, असा सवाल शास्त्रज्ञ उपस्थित करीत आहेत. ‘‘मंडळाला अजून बळकट करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांची भरती उलट भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) दर्जापर्यंत नेण्याची गरज होती. मात्र, आता भलतेच घडत आहे. नव्या बदलामुळे कृषी शास्त्रज्ञ भरतीचा दर्जा अजून घसरू शकतो,’’ असा इशारा एका माजी कुलगुरूने दिला आहे.  भरतीची पारदर्शक चौकट मोडण्याचा डाव  केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाची स्वायत्तता काढून घेण्यात आल्याची माहिती खरी आणि धक्कादायकदेखील आहे, असे मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी सांगितले. ‘‘नव्या नियमामुळे मंडळावरील ‘आयसीएआर’चे नियंत्रण गेले आहे. त्यामुळे मंडळाच्या कामात आता राजकारण घुसण्याची दाट शक्यता आहे. मंडळ ताब्यात घेण्यासाठी कुणी तरी विशिष्ट व्यक्ती हालचाल करीत असावी, तसेच या व्यक्तीची निवड सोपी होण्यासाठी मंडळाच्या मूळ रचनेवरच घाव घातला गेला आहे,’’ असे डॉ. मायी यांनी हताशपणे सांगितले. नव्या बदलाचे परिणाम

  • सर्व कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रांत शास्त्रज्ञांची निवड मंडळामार्फत होते
  • ‘आयसीएआर’मुळेच शास्त्रज्ञ भरतीत राजकीय हस्तक्षेपाला आळा
  • आतापर्यंत पक्षपात, गैरव्यवहाराचा आरोप मंडळावर झाला नाही
  • मंडळाचा ताबा घेण्यासाठी नियम वाकविला ः कृषी शास्त्रज्ञ
  • कृषी मंत्रालयात काही दिवसांपासून बदलाच्या हालचाली
  • कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळवरील ‘अायसीएआर’चे नियंत्रण संपुष्टात
  • पूर्वी माजी कुलगुरू दर्जाचा शास्त्रज्ञ काम पाहत असे
  • नव्या नियमामुळे माजी आयएएस अधिकारी अध्यक्ष शक्य
  • कृषी शास्त्रज्ञ भरतीचा दर्जा अजून घसरू शकतो : माजी कुलगुरू  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com