कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’

कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’

पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे राज्याच्या गुण नियंत्रण विभागाच्या कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात यंत्रणा पुन्हा यशस्वी झाली आहे. मात्र, यवतमाळ घटनेनंतरदेखील कीटकनाशक कक्षाला स्वतंत्र मनुष्यबळ देण्याचे का टाळले जात आहे, असा सवाल काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.  गुण नियंत्रण विभागाच्या सर्व जागा मलईदार श्रेणीत मोडल्या जातात. बदल्या, बढत्यांमध्ये मोक्याचा जागा पटकावायच्या त्यानंतर कायद्याच्या कलमांचा अभ्यास करून त्यातील नियमावलींवर बोट ठेवत खते, कीटकनाशके आणि बियाणे उद्योगातील यंत्रणेकडून मलई मिळवायची, अशी पद्धत या विभागाची असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे या विभागाचे मनुष्यबळ कसे कमी राहील, ऑनलाइन कामकाज बळकट होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालक पदावर विजयकुमार इंगळे यांची नियुक्ती झालेली आहे. तथापि मनुष्यबळ वाढविण्याचे अधिकार त्यांना नाहीत. ‘‘कीटकनाशके कक्षाचे काम दोन कर्मचारी सांभाळत असून या कक्षाला उपसंचालक नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आकृतीबंधात बदल करून पदे निर्माण करणे व या विभागाला पुरेसे मनुष्यबळ देण्याचा निर्णय मंत्रालयातून होणे अपेक्षित आहे,’’ असे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  श्री. इंगळे यांच्या अखत्यारित राज्याचा खते, बियाणे आणि कीटकनाशक कक्षांचा समावेश होतो. यात उत्पादन, पुरवठा, विक्री, तपासणी, काळाबाजार, अप्रमाणित माल, धाडी टाकणे, गुन्हे दाखल करणे, न्यायालयात दावे दाखल करणे अशा विविध महत्त्वपूर्ण विषय हाताळले जातात.  ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी तसेच राज्याच्या पीक उत्पादन-उत्पादकतेशी थेट संबंध असलेल्या या तीन कक्षांसाठी स्वतंत्र रचनेची गरज आहे. संचालकांच्या अखत्यारित एक स्वतंत्र सहसंचालक हवा. सहसंचालकांच्या अखत्यारित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दर्जाचे तीन अधिकारी देऊन त्यांना स्वतंत्र उपसंचालक, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी व पर्यवेक्षकांचे पुरेसे मनुष्यबळ व भरपूर साधनसामग्री देण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.  गुणनियंत्रण विभागाची रचना सुटसुटीत, भक्कम न ठेवता विचित्र पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येते. सध्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी नावाचे पद संचालकांच्या खालोखाल प्रमुख ठेवण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडे बियाणे कक्ष देण्यात आलेला नाही. बियाणे कक्षाला मुख्य गुणनियंत्रण निरीक्षक देण्यात आलेला आहे. मात्र, असे पद कीटकनाशके कक्षाला दिलेले नाही. तेथे एक साधा कृषी अधिकारी ठेवण्यात आलेला आहे. खते कक्षाला उपसंचालक देण्यात आलेला आहे. मात्र, कीटकनाशके कक्षाला उपसंचालक नाही. 

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यावर ताण खते, कीटकनाशके, बियाणे परवाने वितरणाचे कामकाज करणारे कक्षदेखील कमकुवत ठेवण्यात आलेले आहेत. परवाने वितरण रद्द करणे, पुन्हा बहाल करणे ही प्रकिया नाजूक असतानाही त्यासाठी तीन स्वतंत्र उपसंचालक नाहीत. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यावर कामाचा ताण येतो. त्यामुळे गुणनियंत्रणाचे काम दर्जेदार होत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com