कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या गावी कृषी घोटाळा

सदाभाऊ खोतांच्या गावी कृषी घोटाळा
सदाभाऊ खोतांच्या गावी कृषी घोटाळा

सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वीजकनेक्‍शन नसलेल्या २८ जणांना कृषी पंप, मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप आणि जमीन नसताना कृषी योजनांचा लाभ देऊन कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच हा भ्रष्टाचार घडवून आणल्याचे समोर येत आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १२) भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, सचिव त्रिगुण कुलकर्णी यांच्यासमोर बळिराजा शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडने त्याचे सही-शिक्‍क्‍यानिशी पुरावे सादर केले. ते पाहता सकृतदर्शनी घोटाळा झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय, या संपूर्ण योजनांच्या सांगली जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.

बळिराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा तक्रार केली होती. कृषी विभागाने त्याची दखल घेतली नाही. काही अधिकाऱ्यांचे पथक पाठवून चौकशीचा फार्स केला आणि या प्रकरणात काही घडलेच नाही, असा अहवाल सादर केला. त्यावर संशय व्यक्त करत या संघटनांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्या समितीची आज बैठक होती. त्यात सदाभाऊंच्या गावातील घोटाळ्याचे पुरावेच सादर करू, अशी घोषणा पाटील व औंधकर यांनी केली होती. त्यानुसार चार पिशव्या भरून त्यांनी फायली आणल्या होत्या. त्यांनी त्यापैकी काही महत्त्वाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. अतिशय धक्कादायक घोटाळे समोर येत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली.

* २८ पंपांचा घोटाळा मरळनाथपूर येथील २८ शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्‍शन आहे का, याचा दाखला जोडावा लागतो. वास्तविक, वीज कनेक्‍शन नसताना हे पंप दिले गेले. कनेक्‍शन नाही, याचा पुरावा म्हणून महावितरणकडील कनेक्‍शन धारकांची यादी सादर करण्यात आली. हे प्रकरण सप्टेंबरमध्येच चौकशीला दिले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. शब्दखेळ करत प्रकरण दडपले. ते आता वर आले आहे. यासह फलोत्पादन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचे पुरावे स्वतंत्रपणे सादर करा, त्याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. * मयत लाभार्थी रामचंद्र दादू खोत या मयत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती ३० ऑगस्ट १९९० ला मयत झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्या नावे सन २०१५-१६ ला अनुदान देण्यात आले.

* इंचभर जमीन नाही, अनुदान १.३३ लाख संदीप शामराव खोत यांच्या नावे इंचभरही जमीन नाही, तरी त्यांना १ लाख ३३ हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या बैठकीत समोर आला. त्यात गोठा, पलटी, नांगर आदींसाठी अनुदान लाटल्याचे पुरावे सादर करण्यात आले. अशाच पद्धतीने सुनील मारुती खोत यांना तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यांच्या नावे अनुदान लाटण्यात आले आहे. कृषी अधिकारी निरुत्तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे या बैठकीला हजर होते. त्यांच्याकडेच पहिला चौकशी अर्ज आला होता. त्यांनी एक पथक मरळनाथपूरला पाठवले होते. त्याने इथे काही घोटाळा झालाच नाही, असा अहवाल सादर केला होता. त्यामुळे पुरावे समोर आल्यानंतर साबळे यांची पंचाईत झाली. त्यांनी मूळ अर्जात कृषी पंप घोटाळा, हा शब्दच नव्हता, या एका गोष्टीवर पळवाट शोधली खरी, मात्र आता सविस्तर चौकशीत कृषी खात्याची यंत्रणा पुरती गोत्यात येणार असल्याचे चित्र दिसतेय. ---

प्रतिक्रिया "तक्रारदारांनी सादर केलेले पुरावे पाहता कृषी अनुदान योजनेत गैरव्यवहार झाल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांनी अनेक प्रकरण पुढे आणली आहे. माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी होईलच, शिवाय अन्य सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी गरजेची असल्याबाबत मी कृषी आयुक्तांना कळवत आहे.'' - विजयकुमार काळम, जिल्हाधिकारी, सांगली "मंत्र्याच्या दलालांचे टोळके आणि कृषी खात्यातील दलाल अधिकाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केला आहे. आम्ही तो उकरून काढल्यानंतर धमक्‍या आल्या, घरापर्यंत पोचू देणार नाही, अशी भाषा वापरली गेली. आम्ही थांबलो नाही, कारण आमच्या हाती सबळ पुरावे आहेत. हे प्रकरण दडपण्याचा कसोसीने प्रयत्न केला गेला, मात्र खऱ्याला न्याय असतो. आम्ही ताकदीने हे प्रकरण तडीला नेऊ.'' - बी. जी. पाटील, सुयोग औंधकर, तक्रारदार. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com