कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र उपलब्ध करणार

संत्रा बाग छाटणी यंत्र
संत्रा बाग छाटणी यंत्र

नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा बागायतदारांकडून असलेली मागणी लक्षात घेता हे सयंत्र लवकरात लवकर उपलब्ध व्हावे याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासोबतच नादुरुस्त सयंत्राच्या दुरुस्तीकरितादेखील विद्यापीठाने पुढाकार घेत संत्रा बागायतदारांना दिलासा दिला आहे.  राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राला ५५ लाख रुपये किमतीचे संत्रा बाग छाटणी सयंत्र राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाकडून १०० टक्‍के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संस्थेच्या नियोजन्यशून्यतेमुळे हे सयंत्र संत्रा बागायतदारांना वेळीच उपलब्ध होत नव्हते. नोंदणीनंतर तीन-चार महिने सयंत्राकरिता प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे बाग छाटणीची वेळ निघून गेल्याने संत्रा उत्पादकतेवर त्याचा परिणाम होत होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर प्रक्षेत्रावर अशाप्रकारचे यंत्र होते. परंतु त्याचे पाते (ब्लेड) नादुरुस्त असल्याचे सांगत कृषी विद्यापीठाकडून ते उपलब्ध करून दिले जात नव्हते. याचाही फटका संत्रा बागायतदारांना बसत होता. कृषी विद्यापीठाने दोन नवीन सयंत्र इटलीवरून बोलावली आहेत. त्याकरिता अनुदानही सरकारकडून प्राप्त झाले आहे. काटोल तसेच नागपूर येथे प्रत्येकी एक सयंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.  ‘ॲग्रोवन’ने केला पाठपुरावा ‘ॲग्रोवन’ने सोमवारी (ता. १०) या संदर्भाने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत कृषी विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याकडील नादुरुस्त संत्रा छाटणी यंत्र दुरुस्तीच्या हालचालींना वेग दिला. दुरुस्तीनंतर या आठवड्यात ते संत्रा बागायतदारांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती उद्यानविद्या प्रमुख डॉ. रमाकांत गजभीये यांनी दिले. दोन हजार रुपये प्रती एकर याप्रमाणे त्यासाठी दर आकारला जातो. कृषी विद्यापीठाने नवी दोन छाटणी यंत्र बोलाविली आहेत. ३५ लाख रुपये एका सयंत्राची किंमत आहे. इटलीतील ग्रासब्रेझ कंपनीकडून त्याचा पुरवठा होतो. १५ जानेवारीपर्यंत ही सयंत्र भारतात पोचतील, असा विश्‍वास डॉ. गजभीये यांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com