किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...

किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...

आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर असलो तरी एका जनावरापाठीमागे दूध उत्पादनात मागे आहोत. त्याचबरोबरीने प्रतिमाणसी दूध उपलब्धतासुद्धा फार कमी आहे. पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी व्यवस्थापन सूत्राचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसाय करताना प्रत्येकाला वाटत असते, की आपला व्यवसाय फायद्यात राहून अधिक नफा मिळाला पाहिजे; परंतु हे सर्व करत असताना आपल्याकडून नक्की चुका कोठे  होतात हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. दुग्ध व्यवसायाची निवड करताना बऱ्याच वेळेस वडिलांच्या इच्छेखातर किंवा मित्र व्यवसाय करतात म्हणून आपण हा व्यवसाय करतो. आता कोणताच पर्याय उरला नाही म्हणून काही तरी करावयाचे  म्हणून आपण नाईलाजाने या व्यवसायात उतरतो. अशा वेळेस मनापासून हा व्यवसाय न केल्याने यामधील लहान गोष्टींवर आपले लक्ष नसते. त्यामुळे आवश्यक तो फायदा आपणास मिळत नाही.

साधनसामग्री, भांडवल  बऱ्याच वेळेस उपलब्ध साधनसामग्री किंवा भांडवल याचा विचार न करता गुंतवणूक करतो. गोठा बांधकाम व इतर साधनसामग्रीवर गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करतो; परंतु दुधाळ गाई, म्हशी खरेदी तसेच चारा व्यवस्थापनावरील खर्च करण्यासाठी भांडवल कमी पडते. 

व्यवसायासाठीचे ज्ञान  आपण जो व्यवसाय करतो त्याचे आपणास प्राथमिक तरी ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्धे ज्ञान घेऊन किंवा ऐकीव माहिती घेऊन किंवा प्रात्यक्षिक माहिती न घेता आपण हा व्यवसाय करत असाल तर या व्यवसायातून आपणास कधीही फायदा होणार नाही. 

बाजरपेठ अभ्यास  बऱ्याच वेळेस दूध संकलन व्यवस्था किंवा जवळपास दूध विक्रीसाठी शहर नसतानाही आपण व्यवसाय चालू करतो. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे योग्य वेळेस वितरण व्यवस्था आवश्यक आहे. असे न केल्यास एकतर दूध वाहतुकीचा खर्च वाढतो किंवा कमी दरात दूध विक्री करावी लागते.

गाय, म्हैस निवड, पैदास क्षमता  आपण कोणत्या जनावरांचे किंवा कोणत्या जातींच्या जनावरांचे संगोपन करणार आहोत, याचा पुरेसा अभ्यास नसेल तर तोटा होतो. ज्या ठिकाणी ज्या दुधाला चांगली मागणी आहेत, त्या ठिकाणी त्याप्रमाणे गाय किंवा म्हशीचे संगोपन करावे. आपल्या देशातील संकरीत गाय प्रति दिन सरासरी १५ ते १६ लिटर तर परदेशातील गाय  सरासरी ३० ते ३५ लिटर दूध देते. सध्या पशुपालक गाय, म्हैस किती दूध देते यावरून निवड करतात; परंतु ही मोठी चूक आहे. कारण दुधाचे दर हे दुधाच्या गुणवत्तेवर अवलंबून अाहेत. कमी गुणवत्तेचे जास्त दूध देऊनसुद्धा पशुपालकास अपेक्षित फायदा होत नाही. दूध दर ज्यावर आधारित आहे असे स्निग्धांश, एसएनएफ आणि प्रथिने यांचे प्रमाण गाय किंवा म्हशीच्या दुधात किती आहे हे पाहावे. दूध उत्पादनाबरोबरीने रोगप्रतिकार शक्ती, आहाराचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता याचा विचार करावा. 

व्यवस्थापनातील बदल  बहुतांश पशुपालक हे पारंपरिक पद्धतीने पशुपालन करतात; परंतु वातावरणातील बदल लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यामुळे गाई, म्हशींकडून अपेक्षित दुग्धोत्पादन मिळू शकते. त्यांचे आरोग्य चांगले राहील.

उत्पादकता  कमी दूध उत्पादन क्षमतेच्या गाई, म्हशींचे संगोपन करण्यापेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींचे संगोपन करावे. यामुळे दूध उत्पादन खर्च कमी होतो. साधारणपणे प्रतिदिन १० ते १२ लिटर उत्पादन देणाऱ्या पाच गाई सांभाळण्यापेक्षा २० ते २५ लिटर प्रतिदिन दुग्धोत्पादन असणाऱ्या २ ते ३ गाई सांभाळाव्यात.

पाणी आणि चारा नियोजन  गाई, म्हशींसाठी वर्षभर चांगल्या गुणवत्तेचा हिरवा चारा कमी दरात उत्पादित करणे किंवा उपलब्ध करणे आवश्यक आहे. पशुपालक नेमके याकडे दुर्लक्ष करतात. चांगला गुणवत्तापूर्ण चारा पुरवू न शकल्याने जास्त दराचे पशुखाद्य वापरावे लागते. यातून खर्च वाढतो. गोठा स्वच्छता, गाई, म्हशी धुणे आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे शुद्ध पाणी वर्षभर उपलब्ध असावे.  

एकात्मिक दृष्टिकोनाची गरज फक्त दूध हेच उत्पादनाचे साधन हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आज दुधापेक्षा शेणखत विक्रीतून अधिक उत्पन्न मिळविणारे पशुपालक आहेत. याचबरोबर वासरे संगोपन, मुक्त संचार गोठ्यात कोंबडीपालनातून नफ्यात वाढ होऊ शकते. एकात्मिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाकडे पाहावे.  

गाई,म्हशी व्यवस्थापनाची सूत्रे

  • मुक्तसंचार गोठा 
  • व्यवस्थापनाचा ताण कमी होतो, मजुरांची बचत होते.
  • जनावरांची रोग प्रतिकारशक्ती सुधारते, आराम मिळतो, आयुष्यमान वाढते.
  • कमी आहारात जास्त दूध उत्पादन मिळते. जनावराची पचन शक्ती आणि दूध गुणवत्ता सुधारते.
  • गाई, म्हशी गाभण राहण्याचे प्रमाण अधिक राहते, माजावर आलेली जनावरे ओळखणे सोपे जाते.
  • जनावरास जास्तीत जास्त आराम मिळतो.
  • मुक्त संचार गोठ्यामुळे मूल्यवर्धित खत निर्मिती, कोंबडी पालनदेखील करता येते.
  •  आहार

  • दूध उत्पादनानुसार गुणवत्तापूर्ण हिरवा चारा, सुका चारा देणे आवश्यक. 
  • मूरघासामुळे पचन चांगले होते. दूध उत्पादन, गुणवत्ता वाढते.
  • चांगल्या गुणवत्तेचा प्रथिनयुक्त चारा, अझोला, मूरघास, सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया केल्यामुळे कमीत कमी पशुखाद्य वापर करणे शक्य होते.
  • दुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात सर्व घटक मिळतील याची दक्षता घ्यावी.
  • आहारामध्ये हायड्रोपोनिक्स चारा, अझोला, मोड आलेल्या धान्याच्या वापर करावा. यामुळे आरोग्य, प्रजनन सुधारते. कमी खर्चात चांगल्या प्रकारचे दूध उत्पादन मिळते.
  • खाद्य पचन व इतर शरीरक्रियांसाठी गरजेप्रमाणे पाहिजे त्यावेळेस पुरेसे पाणी गोठ्यात उपलब्ध असावे.
  •  आरोग्य

  • उपचारापेक्षा नियंत्रणावर भर द्यावा. यासाठी मुक्तसंचार गोठा, चांगला आहार आणि खनिजांची कमतरता लक्षणावरून दूर केल्यास आरोग्य चांगले राहाते.
  • वेळेवर लसीकरण व जंतनिर्मूलन गरजेचे.
  •   अनुवंशिकता

  • कमी गुणवत्तेच्या जास्त गाई, म्हशी साभाळण्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या दुधाळ गाई, म्हशींचे संगोपन फायदेशीर ठरते.  
  • चांगल्या गुणवत्तेच्या दुधाळ गाई, म्हशी गोठ्यातच तयार करा. चांगल्या गुणवत्तेच्या रेतमात्रा वापराव्यात.
  • दूध उत्पादनाच्या बरोबरीने जातिवंत वासरांच्या विक्रीतून नफा वाढविणे शक्य.
  •  यांत्रिकीकरण

  •  मजूर आणि वेळेत बचत तसेच दर्जेदार दूध निर्मितीसाठी दूध काढणी यंत्र आणि मिल्किंग पार्लरचा वापर फायदेशीर.
  •  मुक्तसंचार गोठ्यातील शेण काढणे आणि भरण्यासाठी डंग कलेक्टरचा वापर करावा. यामुळे मजुरात बचत.
  •  जनावरांच्या संख्येनुसार चाराकुट्टी यंत्राचा वापर करावा. यामुळे चाऱ्याची बचत होते.
  •  वाढीव तापमानाचा गाई, म्हशींवर ताण येऊ नये यासाठी गोठ्यात तुषार सिंचनाचा अवलंब करावा.
  •  गाई, म्हशींना मर्जीप्रमाणे अंग घासता यावे, यासाठी गोठ्यात कमी खर्चाचे ग्रुमिंग ब्रश लावावेत. त्यामुळे आपोआप खरारा होतो. आरोग्य चांगले राहाते.
  •  चारा वाहतूक आणि पूर्ण आहार व्यवस्थितपणे मिसळून देण्यासाठी मिक्सर वॅगनचा वापर करावा. संतुलित आहारामुळे जनावरांचे पचन चांगले होऊन दूध उत्पादनात वाढ मिळते.  : डॉ. शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९
  • ( लेखक गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com