सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला जाईल...

सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला जाईल...
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला जाईल...

अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांना थेट मदत करणे हीच भूमिका सरकारला बजवावी लागेल. डेअरी उद्योजकांवर सर्व ठिकाणी अविश्वास दाखवून चालणार नाही. दूध धंदा वाढीसाठी शेतकऱ्याला चांगला कर्जपुरवठा, साठवण-प्रक्रियेसाठी चांगल्या योजना, खते-बी बियाण्यांसाठी मदत, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांच्या नियंत्रणासाठी उपाय अशा सर्व बाबी हव्या आहेत. त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही. दूध कोंडी फोडण्यासाठी शेतकरी, ग्राहक, प्रक्रियादार, सहकारी संस्था, सरकार अशा सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.  शेती परवडत नसताना निश्चित भावाने आणि रोज पैसा मिळवून देणारे दूध हे एकमेव साधन सध्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. दुधाची अवस्था कांदा किंवा टोमॅटोसारखी नाही. आज एक रुपया तर उद्या दहा रुपये भाव अशी स्थिती दुधात नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी शेतकरी, रतीब टाकणारा वर्ग, दूध सोसायट्या, प्रक्रिया उद्योग, संघ, ग्राहक या सर्व घटकांनी परस्परपूरक भूमिका घेतली पाहिजे.   संकलित होणाऱ्या सर्व दुधावर प्रक्रिया होत नाही. पिशवीबंद दुधाची मोठी बाजारपेठ आहे. दुर्देवाने देशात दूध प्रक्रियेला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे घनरूप प्रक्रियायुक्त दुग्धपदार्थांपेक्षा द्रवरूप दुधाची हाताळणी इच्छा नसतानाही जास्त करावी लागते. युरोपात तसे नाही. तेथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे भारतात दुधाच्या पुरवठ्यापासून ते त्यावर प्रक्रिया, विक्री आणि ग्राहकांची मागणी अशा सगळ्याच बाबींचा अभ्यास करून सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आपल्याकडे दूध उत्पादक शेतकरी सोडला तर पुढील सर्व टप्प्यांवर किमान नफ्यावर काम करावे लागते. म्हणजेच संकलन करणारे, प्रक्रिया करणारे व नंतर मार्केटिंग करणारे असे तीनही घटक कमी पैशात काम करतात. 

 डेअरी उद्योजक लुटारू नाहीत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर १७ रुपयांनी दूध विकत घेऊन ते ५४ रुपयांना विकून मोठी लूट केली जाते असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. दुधाच्या पुरवठा साखळीतील सर्व टप्प्यांचा अभ्यास केल्यास यातल्या अडीअडचणी लक्षात येतील. गायीचे दूध ग्राहकांना ३५ रुपयांनी विकले जात असून कोणीही ५० किंवा ५४ रुपये घेत नाही. मधल्या टप्प्यातील सर्व घटकांना आपआपली गुंतवणूक, नफा पाहूनच व्यवसाय करावा लागतो. पाण्याची बाटली आणि दुधाच्या बाटलीत तुलना करून पाण्यापेक्षा दूध महाग पडत असल्याचा निष्कर्ष काढणेही अन्यायकारक आहे. कच्चा माल आणि त्यापासून तयार होणारा माल यातील तफावत मोठी आहे. उदाहरणार्थ, पाण्याची बाटली तयार करणाऱ्यांना कच्चा माल असलेले पाणी केवळ दोन- अडीच रुपये लिटरने मिळते व त्यापुढील खर्च १६-१८ रुपये वाढून आपल्याला बाटली २० रुपयांना मिळते. तोच नियम दुधाला लावला तर १७ ते १८ रुपये दराने घेतले जाणारे गायीचे दूध (कच्चा माल ) पुढे ८० किंवा १०० रुपयांना कोणी विकते का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे, असे एका डेअरी व्यावसायिकाने सांगितले. ग्राहकांना दूध महाग मिळते ही वस्तुस्थिती आहे. पण, शेतकऱ्यांनादेखील त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने मधला वाटा भरून देणे हाच एक पर्याय आहे. कारण, दूध हाताळणाऱ्या किंवा प्रक्रिया करणाऱ्या घटकांना बाजारात परवडत नसतानाही जादा भाव सतत देणे शक्य नाही. दुधापासून भुकटी किंवा लोणी तयार करण्यासाठी देखील खर्च येतोच ना? त्यामुळे भुकटी किंवा लोण्याच्या बाजारपेठेची काय स्थिती आहे हे पाहूनच कोणीही आपल्याला कच्च्या मालाचे भाव ठरवणार. कोणत्याही उद्योगाचा तो नियमच आहे.   शेतकरीदेखील दुधाचा व्यवसाय कृषी उद्योगाच्या अंगाने करत आहेत हे आपल्याला वारंवार आता पटवून द्यावे लागेल. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचे तंत्र, त्यानुसार होणारी नफ्यातोट्यातील वाढ-घट याचे सूत्र दुधाला लावावे लागेल. यासाठी शेतकऱ्याला उद्यमशील करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जा वाढविणे अशी कामेदेखील करावी लागतील. आमचे असे म्हणणे आहे की सरकारचा कोणत्याही उद्योगात कमीत कमी हस्तक्षेप हवा. हस्तक्षेप करायचा असल्यास वेळप्रसंगी मदत करण्याचीदेखील भूमिका हवी.    जागतिक प्रवाहाचे भान हवे आपण आता `ग्लोबल व्हिलेज`च्या जगात आहोत. विदेशात द्रव स्वरूपातील दूध केवळ १०-१५ टक्के विकले जाते. भारतात हेच प्रमाण ४५ टक्के असल्याने इथे समस्याच जास्त दिसतात. जगात आपलेच दूध महाग आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही ते पिछाडीवर आहे. विदेशात दूध प्रकल्पांचे किंवा दूध उत्पादकांचे आर्थिक गणित भुकटी किंवा बटर ऑईल या मूळ उत्पादनाशी निगडित आहे. जागतिक बाजारात आपली भुकटी किंवा बटर ऑईल खूप मागे आहे. त्यामुळे भारतीय डेअरी उद्योगाला एक तर आपला उत्पादन खर्च कमी करणे किंवा तोटा सहन करून उत्पादने विकणे असे दोनच पर्याय उरतात. भारतात दुधाचे उत्पादन वाढलेले आहे. मागणीपेक्षा दुधाचा भरपूर पुरवठा होतो आहे. गायीच्या दूध पुरवठ्याचा शुष्क काळ संपुष्टात येऊन बहुतेक पुष्ट काळ वाढलेला आहे. देशातील दूध उत्पादनात गायीच्या दुधाचा वाटा ५५ टक्के, म्हशीच्या दुधाचा ४५ टक्के तर इतर दुभत्या प्राण्यांचा वाटा १५ टक्के आहे. गायीच्या दुधाचा पुरवठा जादा असल्यामुळे प्रक्रियेचेदेखील संदर्भ बदलतात. (म्हशीच्या दुधाचे फॅट जादा असल्यामुळे त्याचे पदार्थ चांगले तयार होतात.)  दुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना नेहमीच कमी भावात कच्चा माल मिळावा असेच वाटणार. ती स्थिती कोणत्याही प्रक्रिया उद्योगात असते. मात्र, शेतकरी वर्गाची गळचेपी करून कोणी प्रक्रिया करतो अशी स्थिती नाही. मागणी व पुरवठ्याचे गणित विचारात घेऊन प्रक्रियेत कच्च्या मालाचे भाव कमी- जास्त होतात. त्यामुळे भाव बदलाची मानसिकता शेतकरी वर्गाची देखील तयार झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला अडचणीच्या काळात त्यांना सरकारनेदेखील मदत केली पाहिजे.  एका डेअरीचालकाच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार पुढे आले. अर्थात, मदत करताना खासगी प्रक्रिया उद्योग आणि सहकारी संघ असा भेद करता कामा नये. कारण, खासगी उद्योगदेखील शेतकऱ्यांचेच दूध घेतात. मदतीसाठी सरकारने व्यवस्थित यंत्रणा बसवावी. आपल्या मदतीचा गैरवापर होऊ नये याची काळजी सरकारने जरूर घ्यावी मात्र शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून मदतीचे वाटप व्हावे. उठसूठ खासगी प्रकल्पांवर शंका उपस्थित करणे योग्य नाही. सरकारने राज्यातील सर्व दूध गोळा करून आमच्या ताब्यात दिले तरी आमची हरकत नाही. विदेशात ७० टक्क्यांपेक्षा जास्त दुधावर प्रक्रियाच होते. तेथे उपपदार्थांची बाजारपेठ मुख्य असते. इकडे दुधाची बाजारपेठ मुख्य व उपपदार्थाला काहीच मागणी नसल्याचे चित्र आहे. सरकारने ही वस्तुस्थिती विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवेत.    दुधाची उत्पादकता हा कळीचा मुद्दा दूध धंदा परवडणारा करण्यासाठी दुधाची उत्पादकता वाढविणे आपल्या हातात आहे. त्यासाठी सरकारी मदतीने भरपूर उपाय करता येतील. आम्ही उद्योजकदेखील व्यक्तीशः शेतकऱ्यांना तशी मदत करतो. दुधावर प्रक्रिया वाढवायची असेल तर सरकारला तसे जाळे तयार करावे लागेल. प्रक्रिया केंद्रे वाढवावी लागतील. साठवण गृहे वाढवावी लागतील. दुसरे असे की दुधाला ७०:३० सूत्र लावण्याची मागणीदेखील तपासून पाहिली पाहिजे. हे सूत्र ऊस उत्पादकांसाठी असून तेथे ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना जाण्यासाठी मुख्य वस्तू साखर आहे. इकडे दुधात आमची मुख्य वस्तू भुकटी आहे. भुकटीचेच बाजार पडलेले आहेत. दुधाचे रूपांतरण मूल्य जादा आहे. तेथे सतत चढ-उतार असतात. त्यामुळे जादा दूध झाल्यास तेथे प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी मदत करणे, शेतकऱ्यांनाही मधला भाव मिळवून देणे हीच भूमिका सरकारला बजवावी लागेल. डेअरी उद्योजकांवर सर्व ठिकाणी अविश्वास दाखवून चालणार नाही, असेही हा डेअरीचालकाने नमूद केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैशांचे व्यवस्थापन, नफ्याचे गणित आणि उत्पादकतावाढीचे सूत्र सांगणे हे आपल्या हातात आहे. केवळ भावनेच्या भरात काहीही सांगत सुटल्यास शेतकऱ्यांचीही दिशाभूल होते. कोणत्याही व्यवसायातील चढउतार शेतकऱ्यांना काळजीपूर्वक सांगून त्यांना `कॅश मॅनेजमेंट`चे धडे दिल्यास शेतकऱ्यांचे गैरसमज होणार नाहीत. आम्ही ते काम सुरू केले आहे, असे डेअरी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.  “शेतकऱ्याला नफा केंद्रित व्यवसाय शिकवण्याची गरज आहे.  नफा कमवणे हा गुन्हा नाही. मात्र, दुसऱ्याला ओरबाडून नफा घेणे हा गुन्हा समजला पाहिजे. शेतकऱ्याचे सबलीकरण करत त्याला नफा-तोट्याचे सूत्र सांगितल्यास दूध धंद्याविषयी चालू असलेला अपप्रचार थांबेल, असा विश्वास वाटतो. दूध धंदा वाढीसाठी शेतकऱ्याला चांगला कर्जपुरवठा, साठवण-प्रक्रियेसाठी चांगल्या योजना, खते-बी बियाण्यांसाठी मदत, शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांच्या नियंत्रणासाठी उपाय अशा सर्व बाबी हव्या आहेत. त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही,” असे कोल्हापूरमधील एका डेअरी अभ्यासकाने सांगितले.  आणखी एका प्रतिथयश डेअरीचालकाच्या म्हणण्यानुसार, दुधाच्या भेसळीबाबतदेखील असाच बनाव केला जात आहे. भेसळीला कोणीही मान्यता दिलेली नाही. दुधाचा व्यवसाय दर्जा याच मुद्यावर चालतो. अर्थात काही अपप्रवृत्ती या व्यवसायात आहेत. त्याचे नियंत्रण सरकारने करावे. पण, सर्वच डेअरी उद्योजक भेसळखोर आहेत, असे चित्र उभे करू नये. शेवटी समाज हा विश्वासावर चालतो. विश्वास हा तयार करावा लागतो आणि टिकवून ठेवावा लागतो. तो विकत घेता येत नाही. राज्याच्या दुग्ध व्यवसायात विश्वासाचे नाते मोठ्या कष्टाने तयार झालेले आहे. चुका टाळल्या पाहिजेत पण विश्वास सतत वाढला पाहिजे. त्यासाठी शेतकरी, ग्राहक, प्रक्रियादार, सहकारी संस्था, सरकार अशा सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. सगळ्यांचे हात लागले तरच हा गोवर्धन उचलला जाईल, याचे भान हरपू देता कामा नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com