अक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाई

अक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाई
अक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाई

डा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते. वाढता उत्पादन खर्च, मागणीच्या तुलनेत जास्तीचा पुरवठा, गुणवत्तापूर्ण मालाच्या पुरवठ्यातील घट या बाबींमुळे डाळिंबाचा बाजार फारसा किफायती नव्हता. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन पाहणीनुसार देशात २०१५-१६ मध्ये २३ लाख टन , २०१६-१७ मध्ये २६.१ लाख टन उत्पादन मिळाले, तर २०१७-१८ मध्ये २७.९ लाख टन उत्पादन अनुमानित आहे. तीन वर्षांत उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले. वाढत्या उत्पादनाचे प्रतिबिंब सातत्याने दबावात राहणाऱ्या बाजारभावात दिसले आहे. या पार्श्वभूमीवर, २०१८ या वर्षाची सुरवात चांगली झाली असली तरी सध्याची तेजी दीर्घकालीन नाही. मेच्या मध्यापर्यंत बाजारभाव किफायती राहतील, तेथून पुढे ऑगस्टपर्यंत बाजार नरमाईत राहण्याची चिन्हे आहेत. सटाणा येथील कृषी उद्योजक योगेश रौंदळ यांची डाळिंबाच्या बाजाराबाबतच निरीक्षणे उद्बोधक आहेत. ते सांगतात - १. मागील वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील पाऊसमान डाळिंबासाठी प्रतिकूल होते. त्यामुळे जानेवारीपासून ते आजअखेरपर्यंत देशांतर्गत बाजारात डाळिंबाचा तुटवडा आहे. परिणामी चांगल्या गुणवत्तेच्या मालास ७० ते १०० रु. प्रतिकिलो या दरम्यान बाजारभाव मिळाला. २. गेल्या वर्षी नाशिक-नगर जिल्ह्यामध्ये जानेवारीनंतर डाळिंबात मोठी उत्पादनवाढ झाली होती. या वर्षी तशी परिस्थिती नाही. ३. मागील वर्षाचा अपवाद वगळता जानेवारी ते एप्रिल हा कालावधी बहुतांश वेळा चांगला बाजारभाव मिळालेला आहे. ४. चालू कॅलेंडर वर्षांत १५ मेपर्यंत डाळिंबाला किफायती दर मिळेल. त्यानंतर आंब्याची आवक सुरू झाल्यानंतर डाळिंबाचा बाजार खाली येईल. ५. डिसेंबर - जानेवारीतील अनुकूल हवामानामुळे बागांना उत्तम सेटिंग मिळाली. मे मध्ये या बागा काढणीला येतील तेव्हा पुरवठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. परिणामी, मे ते ऑगस्ट हा कालावधीत मंदीचा असू शकतो. ६. फेब्रुवारी - मार्चमध्ये पानगळ झालेल्या बागांना चांगला फुटवा नाही. त्यामुळे सप्टेंबरपासून पुढे मालाचा पुरवठा कमी होऊन बाजारभाव पुन्हा उंचावतील. ७. सध्याच्या उच्चांकी तापमानवाढीमुळे डाळिंबाची कळी जागेवरच जिरतेय. एप्रिलमध्येही अशीच तापमानवाढ राहिल्यास फळधारणा अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. अशा परिस्थितीत सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत डाळिंब तेजीत असेल. महाराष्ट्राबाहेर डाळिंबाखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे बाजार मंदीत राहतोय, अशी निरीक्षणे सध्या मांडली जात आहेत. संपूर्ण देशात २ लाख ८ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. त्यातील ६५ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील उत्पादन वाढ-घटनुसार देशातील डाळिंबाचा बाजारभाव नियंत्रित होतो. मात्र, गेल्या दशकभरात डाळिंबास मिळालेल्या चमकदार बाजारभावामुळे अन्य राज्यांतही त्याखालील क्षेत्र वाढले आहे. अलीकडच्या काळात डाळिंबाची वार्षिक उत्पादनवाढ ७ टक्के दराने होत आहे. मात्र देशांतर्गत बाजारात उत्पादनवाढीच्या वेगानुसार मागणी वाढत नसल्याचे दिसते. प. बंगाल, दिल्ली असे पारंपरिक बाजार वगळता अन्यत्र फारसा उठाव दिसत नाही. खासकरून, पुण्या-मुंबईसारख्या महानगरात ज्या वेगाने डाळिंबाचा खप व्हायला हवा, तसा तो होत नाहीये. डाळिंबाच्या पोषणमूल्यासंदर्भात महाराष्ट्रात जनजागृती होण्याची गरज दिसते. डाळिंबाचा किरकोळीतील दर हा देखील खपवाढीत अडसर आहे. किरकोळ बाजारात ज्या ज्या वेळेस १०० रु. प्रतिकिलोच्या वर डाळिंब जाते, त्या वेळी त्याचा खप रोडावतो. दुसरीकडे, ज्या वेळेस किरकोळ बाजारात ६० ते ७० रु. भाव असतात, तेव्हा मोठा उठाव मिळतो. जर चांगला माल किरकोळीत ६० रु. ला विकला गेला तर त्याचा फार्म कटिंग रेट हा ३५ ते ४० रु. पर्यंत घटू शकतो. अशा परिस्थितीत डाळिंबाची शेती फारशी किफायती राहत नाही. चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाचा फार्म कटिंग रेट हा किमान ५० रु. च्या असायला हवा. त्यानुसार किरकोळीतील दर ७० ते ९० रु. दरम्यान जाऊ शकतो. शेतातून डाळिंबाचे कटिंग झाल्यानंतर - माल उचलणाऱ्या खरेदीदाराचा मार्जिन, वाहतूक खर्च, किरकोळ विक्रेत्यांचा मार्जिन, घट या प्रक्रियेत फार्म कटिंगच्या तुलनेत किरकोळ विक्रीतील दर ८० ते १०० टक्क्यांपर्यंत महाग होतो. देशात २००६ ते २०१६ या दशकात डाळिंबाच्या बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. त्यामुळे नवी पिढी या नगदी पिकाकडे वळली आहे. या पार्श्वभूमीवर, यापुढील काळात डाळिंबाचे बाजारभाव फारसे चमकदार राहणार नाहीत. ज्या वेळेस प्रतिकूल हवामान असेल, त्या त्या वेळी नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रित झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन तेजी येईल. अशा प्रतिकुलतेत ज्यांना गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे उत्पादन घेता येईल, त्यांना पैसा मिळेल. सरसकटपणे डाळिंबात पैसा घडण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com