गडहिंग्लजमध्ये साडेतीन टीएमसी जलसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : यंदाचा मार्च महिना संपत आला तरी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील २२ प्रकल्पांमध्ये अद्याप साडेतीन टीएमसीचा जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा साठा पाऊण टीएमसीने अधिक आहे. यंदा पाण्याचे टेन्शन नसले तरी उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

उन्हाळ्याचे अजून दोन ते अडीच महिने शिल्लक असल्याने जेवढी काटकसर करता येईल, तितकी करून हा जलसाठा जुलैपर्यंत कसा जाईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात २२ मध्यम व लघुपाटबंधारे तलाव आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा केला जातो. गतवर्षीच्या पावसाळ्यात साठा निम्म्यापर्यंतच पोचला होता, परंतु परतीच्या पावसाने हात दिल्याने त्याचवेळी बहुतांशी प्रकल्प तुडूंब भरले. याचा फायदा अधिक साठा शिल्लक राहण्यासाठी झाला आहे. कारण परतीच्या पावसाने पिकांना नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पाणी देण्याची वेळ क्वचितच आली. परिणामी तलावातील पाणीसाठा उपसा झाला नाही.

जानेवारीपासूनच खऱ्या अर्थाने पाणीउपसा सुरू झाला. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत अधिकाधिक पाणीसाठा वापरण्यास मुभा मिळाली आहे.

गत पाच वर्षांतील साठा लक्षात घेता बहुतांश प्रकल्पांतील यंदाचा साठा तुलनेत समाधानकारक असल्याचे चित्र आहे. परतीचा पाऊस हे एकमेव कारण यामागचे असल्याचे सांगण्यात येते. विशेषकरून चंदगड तालुक्‍यातील प्रकल्पांमधील साठा अधिक शिल्लक आहे. घटप्रभा नदीवरील फाटकवाडी प्रकल्पातील २५ टक्के साठा दरवर्षीच शिल्लक राहतो. 

तसेच जंगमहट्टी, किटवाड प्रकल्पातही बऱ्यापैकी साठा आहे. गडहिंग्लजमधील हिरण्यकेशी नदीकाठावरील गावांना वरदायी ठरलेला चित्री प्रकल्पातही यंदा या महिन्यात ९७३ एमसीएफटी इतका समाधानकारक साठा शिल्लक आहे. गतवर्षी हाच साठा ६४७ एमसीएफटी इतका होता. तालुक्‍यातील लघुपाटबंधारे तलावातही पाणीसाठा बऱ्यापैकी शिल्लक असून हे पाणी जून-जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरावे म्हणून पाटबंधारे खात्याने नियोजन केले आहे. आजऱ्यातील एरंडोळ लघु प्रकल्पातील साठाही मुबलक आहे. या प्रकल्पात अद्याप १०७ एमसीएफटी पाणी शिल्लक असून हे पाणी आणीबाणी काळात हिरण्यकेशी नदीत सोडले जाते.

दरम्यान, तिन्ही तालुक्‍यांतील २२ प्रकल्पांमध्ये २५ मार्चअखेर २०१३ मध्ये ३०३४, २०१४ ला ३७०२, २०१५ मध्ये ४०५२, २०१६ मध्ये २९२८, २०१७ मध्ये २९०० एमसीएफटी इतका पाणीसाठा होता. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजेच ३४८० एमसीएफटी इतका साठा आहे. प्रकल्पांमधील हा पाणीसाठा समाधानकारक असला तरी पाटबंधारे खात्याने उपसाबंदीचे नियोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com