agriculture news in marathi, agrowon, aglekh on bamboo | Agrowon

‘बांबू’चा भक्कम आधार
विजय सुकळकर
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

बांबूची लागवड राज्यात वाढली आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा मूलस्थानी विकास झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सुधारण्याबरोबर ग्रामीण अर्थकारण समृद्ध करण्याची क्षमता या पिकामध्ये आहे.

बहुपयोगी बांबूचे राज्यात अपेक्षित प्रमाणात क्षेत्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळून उत्पादन वाढविण्यासाठी ‘महाराष्ट्र बांबू विकास मंडळा’चे प्रयत्न चालू आहेत. दर्जेदार बांबू रोप/कलमांचा अभाव, लागवडीसंदर्भात तांत्रिक माहितीचाही अभाव, तोडणी-उपयोग यांच्या परवान्याबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम आणि लागवडीसाठी खर्चाची तजवीज होत नसल्याने बहुसंख्य शेतकरी बांबू लागवडीस धजावत नाहीत. या समस्या हेरूनच बाहेर राज्यांतून उतिसंवर्धित दर्जेदार रोपे आणण्यापासून लागवडीसाठी कर्जपुरवठ्याबाबतचे मंडळाचे प्रयत्न स्वागतार्ह म्हणावे लागतील.

देशात पुरातन काळापासून बांबूचा वापर दिसून येतो. बांबूवने हे पूर्वीपासून ते आजतागायत दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांच्या जीवनाचा मुख्य आधार आहेत. अलीकडच्या काळात पारंपरिक हस्तकलेबरोबर फर्निचर, बांधकाम साहित्य, पर्यावरण संवर्धन, ऊर्जानिर्मिती तसेच विविध औद्योगिक कारणांसाठी बांबूचे उपयोग वाढले आहेत. बांबूचे कोवळे कोंब खाद्यान्न म्हणून वापरले जातात. अशा कोंबापासून सूप, लोणचेही तयार केले जाते. बांबूपासून बायोगॅस, इथेनॉलनिर्मितीही केली जाऊ शकते.

चीनमध्ये तर बांबूची पाने, फांद्यांपासून रसायने शोधून त्याचा औषधींमध्ये वापर केला जातो. बांबूचा वाया जाणारा भुसा, तुकड्यांवरही प्रक्रिया करून या देशात कोळसा आदी उत्पादने तयार केली जातात. अशा प्रकाराच्या विविध उपयोगी बांबूची लागवड राज्यात वाढली आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा मूलस्थानी विकास झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सुधारण्याबरोबर ग्रामीण अर्थकारण समृद्ध करण्याची क्षमता या पिकामध्ये आहे.  

आपल्या देशात बांबूचे क्षेत्र पूर्वोत्तर राज्यांमध्ये अधिक आहे. महाराष्‍ट्रात देशाला लागणाऱ्या बांबूपैकी १० टक्के उत्पादन होते. यापैकी ९० टक्के बांबू उत्पादन हे विदर्भ, खानदेशाच्या जंगलांतून मिळते. आजही जंगलातील बांबूकडे औद्योगिक पीक म्हणून पाहिले जात नाही, त्याची फारशी निगाही कोणी ठेवत नाही. जंगलातील बांबूची व्यायसायिक उपयोगासाठी चुकीच्या पद्धतीने तोड होत असल्याने बराचसा बांबू निरुपयोगी ठरून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अशा वेळी बांबू हे नगदी पीक म्हणून शेतात यायला पाहिजे.

शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे आणि लागवडीस अर्थसाह्य मिळाल्यास राज्यात बांबूचे क्षेत्र वाढू शकते. परंतु सध्याची बॅंकेद्वारे अर्थसाह्याची योजना विदर्भापुरती मर्यादित असल्याचे कळते. ही योजना राज्यभर लागू करण्यात यावी. बांबूची पीक म्हणून लागवड जेव्हा शेतकरी करू लागतील, त्या वेळी बांबूच्या शास्त्रीय लागवडीबरोबर प्रगत व्यवस्थापन तंत्रसुद्धा मिळायला हवे. राज्यातील बांबूचा प्रामुख्याने उपयोग तोडल्यानंतर थेट बांधकाम व्यावसायिकांकडून होतो. क्षेत्र आणि उत्पादन वाढवायचे म्हटले तर बांबूवरील विविध प्रक्रियांबाबतच्या प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम शासनाला हाती घ्यावा लागेल.

ग्रामीण भागातील तरुण, महिला बचत गट यांना प्रशिक्षण मिळाल्यास ते मागणीनुसार बांबूची विविध उत्पादने बाजारात आणतील. बांबू हस्तकला कारागीरांनाही प्रशिक्षण, सुविधा दिल्यास विविध वस्तूनिर्मितीला चालना मिळेल. चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांनी बांबूवर आधारित विविध उद्योग उभे केले. बांबूची विविध उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पाठवून देशाचे अर्थकारण बदलून टाकले आहे. असे काम आपल्या देशात, राज्यात व्हायला पाहिजे. असे झाले तरच गरिबाचे लाकूड म्हणून देशात ओळखल्या जाणाऱ्या बांबूला हिरवे सोने म्हणून सर्वत्र संबोधले जाईल.

इतर संपादकीय
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
मेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...
थेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...
बँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार! बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...
इडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...
शेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....
"आशा'कडून न होवो निराशा! "आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
बीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...
साखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...
धरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...