अनियंत्रित व्यवस्थेचे बळी

शेतकऱ्यांमध्ये शास्त्रशुद्ध फवारणीबाबत प्रबोधन करताना बाजारात विक्रीसाठीची कीडनाशके, त्यातील भेसळ, त्यांचे लेबल क्लेम हेही तपासून त्यांच्या अनियंत्रित विक्रीवर निर्बंध लादायला हवेत.
संपादकीय
संपादकीय

कापसावर कीडनाशकांची फवारणी केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील ११ शेतकरी-शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर विषबाधा झालेल्या शेकडो शेतकरी-शेतमजुरांवर रुग्णालयात उपचार चालू अाहेत. खरं तर ही घटना दुर्दैवी असून पीक संरक्षणाबाबत सर्वच स्तरावरील गाफीलपणा यातून उघड होतो. घातक अशा कीडनाशकांच्या वापराबाबत उत्पादक कंपन्या-विक्रेते-आणि शेतकरी अशी सरळ शृंखला विकसित झाली अाहे. या शृंखलेत शासन-प्रशासन-कृषी विभागाचा काहीही रोल नाही, असेच या घटनेवरून स्पष्ट होते.

गंभीर बाब म्हणजे शेतात कीडनाशके, तणनाशके यांच्या वापराबाबत विक्रेते (कृषी सेवा केंद्रचालक) हेच शेतकऱ्यांचे मुख्य मार्गदर्शक झाल्याचे हे सर्व परिणाम आहेत. विषबाधा झालेल्या या जिल्ह्यामध्ये कीडनाशके फवारणीबाबतच्या सर्व शिफारशी, फवारणी करतानाची मार्गदर्शक तत्त्वे या बाबींना धाब्यावर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे.

कापसावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव अधिक म्हणून शिफारशीत प्रमाणाच्या चारपट अधिक कीडनाशकांचे प्रमाण वापरण्याचा सरळ सल्ला विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शक्यतो कीडनाशके एकत्र करून फवारणी करूच नये, अथवा काही कीडनाशके एकत्र करण्याची शास्त्रशुद्ध शिफारस असताना विषबाधाग्रस्त विभागात विक्रेत्यांच्या शिफारशीनुसार अनेक कीडनाशके एकत्र करून फवारणी केली गेली आहे. कीडनाशके उत्पादक कंपन्यांचे विक्रेत्यांना टार्गेट असते. टार्गेट पूर्ण करणाऱ्या विक्रेत्यांना कंपनीकडून अधिक मार्जिन देऊन त्यांची विदेशी सहलही घडवून आणली जाते. याचा अर्थ स्वार्थासाठी कीडनाशक उत्पादक कंपन्या आणि विक्रेते शेतकरी शेतमजुरांच्या जिवाशी खेळत आहेत.

कीडनाशके उत्पादन, आयात, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापर यावर नियंत्रणासाठी कायदा आहे. या कायद्याचा मुख्य हेतू मनुष्य अथवा इतर प्राणिमात्रांस संभवणारे धोके टाळणे आणि संबंधीच्या सर्व बाबी नियंत्रित करणे हा आहे.

कीडनाशकांच्या रितसर नोंदणीपासून पॅकिंग, लेबलिंग, विषाची तीव्रता, वेस्टनावरील धोक्याची सूचना, भेसळ याबाबतची नियमावली ठरलेली आहे. मात्र, हा कायदा केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. याही पुढील बाब म्हणजे कीडनाशके खरेदी, साठवण, हाताळणी, वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत शास्त्रशुद्ध सूचना-शिफारशी आहेत. हे सर्व तपासण्यासाठी कृषी विभागाची स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असताना कीडनाशके उत्पादन, विक्री याबाबत कंपनी-विक्रेते पातळीवर काहीही काळजी घेतली जात नाही.  शेतकऱ्यांमध्येही प्रबोधनाचा अभाव असून कृषी विभागाचे यावर नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे विषबाधा होऊन जीव गेलेले शेतकरी-शेतमजूर हे कीड नियंत्रणातील अनियंत्रित व्यवस्थेचे बळी म्हणावे लागेल.

लोकांचा जीव गेल्यावर जाग्या झालेल्या यंत्रणेने आता फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. हेच काम त्यांनी जून-जुलैमध्ये केले असते तर शेतकरी-शेतमजुरांचे प्राण वाचले असते. शेतकऱ्यांमध्ये शास्त्रशुद्ध फवारणीबाबत प्रबोधन करताना बाजारात विक्रीसाठीची कीडनाशके, त्यातील भेसळ, त्यांचे लेबल क्लेम हेही तपासून त्यांच्या अनियंत्रित विक्रीवर निर्बंध लादायला हवेत.

विषबाधाग्रस्त या भागात आरोग्य यंत्रणेचेही तीन तेरा वाजलेले असल्याचे उघड झाले आहे. या भागातील अनेक आरोग्य केंद्रांवर डॉक्टरच नाहीत. तसेच सोयीसुविधेच्या अभावी विषबाधीत रुग्णांवर थातूरमातून उपचार केले जात अाहेत. शासन प्रशासनाने याचीही दखल घेऊन आवश्यक डॉक्टर तसेच विषबाधा कमी करण्यासाठीची अद्ययावत उपचार पद्धती आणि त्या अानुषंगिक सोयी तत्काळ पुरवायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com