‘ॲग्री हिरों’चे हवे अधिक अनुकरण

संशोधक- प्रयोगशील शेतकरी फ्लेक्सवर झळकायलाच हवेत; परंतु त्याही पुढे जाऊन अशा यशस्वी शेतकऱ्यांचे इतर शेतकऱ्यांकडून अनुकरणही झाले पाहिजे.
संपादकीय
संपादकीय

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला लवकरच ‘ॲग्री हिरो’ नावाची अभिनव संकल्पना राबविणार आहे. याअंतर्गत दर आठवड्याला विदर्भातील एका यशस्वी शेतकऱ्याच्या नावाचा फ्लेक्स त्यांनी शेतीत राबविलेल्या नवनवीन उपक्रमांसह राज्याच्या उपराजधानीचे ठिकाण नागपूरच्या मध्यवर्ती भागात लावला जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले शेतीतील ‘रिअल हिरो’चे कार्य या संकल्पनेद्वारा सर्वांसमोर आणणार आहेत. आज आपण पाहतोय, शेतीबद्दल सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. शेती आर्थिकदृष्ट्या परवडेना म्हणून शेतकऱ्यांची मुलं शेतीत उतरायला तयार नाहीत. तर अनेक शेतकरी शेतीला रामराम ठोकून शहरात मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत आहेत. अशा वेळी आपल्या अपार कष्टातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हायलाच हवी. त्यांच्या कष्टाचा सन्मानही व्हायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे शेतीबाबत नकारात्मक वातावरणातसुद्धा काही शेतकऱ्यांचे शेतीत नवनवे प्रयोग चालू आहेत. प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि प्रचंड मेहनतीतून शेतीत यशोगाथा साकारल्या जात आहेत. असे शेतकरी फ्लेक्सवर झळकायलाच हवेत. त्यामुळे या उपक्रमाचे स्वागतच आहे. 

विदर्भातील शेतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जिरायती शेती क्षेत्र, एकच एक पीक पद्धती, सिंचन-पूरक व्यवसायाचा अभाव, पाणीबचत - वापराबाबत फारसे प्रयोगही या भागात झालेले नाहीत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत पीक वाया गेले अथवा उत्पादन कमी मिळाले की उत्पन्नाचे विविध स्रोत शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत येतात. शेतीमालाची विक्री, मूल्यवर्धन, बाजारभाव याबाबतही समस्याच समस्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबना होते, घेतलेले कर्ज फिटत नाही. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. असे असताना या भागातीलही अनेक शेतकरी नवीन पीकपद्धती, नवतंत्रज्ञानाचा वापर, पाणीवापराच्या कार्यक्षम पद्धती, पूरक व्यवसाय आदींबाबत प्रयोग करून यशस्वी, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. परंतु अशा यशोगाथांचे अनुकरणाचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसून येते.

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी शोधून त्यांचे प्रयोग, नवसंशोधन, नवतंत्रज्ञान यावर विद्यापीठांमध्ये काम करायला पाहिजे. अशा संशोधक शेतकऱ्याबरोबर विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ देऊन त्यांनी केलेल्या प्रयोगाच्या चाचण्या व्हायला पाहिजेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे संशोधन, प्रयोग रिफाइन करून त्याबाबच्या अधिकृत शिफारशींचा प्रसार प्रचार विद्यापीठांनी करायला हवा. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे इतर शेतकऱ्यांकडून अनुकरणही वाढेल. २०१२ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचेच तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी शेतकऱ्यांच्या संशोधनाला ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये स्थान दिले होते. त्यास उत्तम प्रतिसादही लाभला होता. विदर्भातील १०५ संशोधक शेतकऱ्यांनी यात भाग घेऊन आपल्या उपक्रमांचे प्रात्यक्षिक सादर केले होते. त्याच वेळी दरवर्षीच्या जॉइंट ॲग्रेस्कोमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असावा, याबाबत ठराव कृषी विद्यापीठांनी मंजूर करून घेतला होता. परंतु पुढे त्याची अंमलबजावणी मात्र कोणत्याही कृषी विद्यापीठाकडून झालेली नाही. त्यातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचे संशोधन मागे पडत आहे. काही व्यावसायिक तर शेतकऱ्यांचे संशोधन चोरून गब्बर झाले आहेत. हे सर्व प्रकार थांबवून शेतकऱ्यांचे संशोधन, प्रयोगाला बळ देण्यासाठी कृषी विद्यापीठांनीच आता पावले उचलायला हवीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com